सांगली : गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी झालेल्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याने अंकली गावात मंगळवारी मोठा तणाव निर्माण झाला. गावकऱ्यांनी अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेलेले पार्थिव परत गावात आणून संशयितांच्या घरापुढे ठेवून कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी आश्वासन देताच अंत्यसंस्कार करण्यात आले. गाव बंद ठेवून संशयितांचा निषेध करण्यात आला.
शनिवारी अंकली (ता. मिरज) या गावी गणेश विसर्जन मिरवणुकीत भांडण सोडविण्यास गेलेल्या शीतल धनपाल पाटील (वय ३०) या तरुणावर तिघांनी चाकूने वार केले होते. गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. रात्री गावात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. विसर्जन मिरवणूक सुरू असताना दोन गटांत भांडण झाले होते. यावेळी शीतल पाटील हा भांडण सोडवण्यास गेला असताना त्याला हल्लेखोरांनी चाकूने भोसकले. शीतललातत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असताना शीतलचा सोमवारी रात्री मृत्यू झाल्यानंतर आज सकाळी त्याचे पार्थिव अंकली गावात नेण्यात आले. चाकूहल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याने गावात संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. आज सकाळी अंत्ययात्रा गावातून नेत असताना मोठा तणाव निर्माण झाला होता. स्मशानात पार्थिव नेल्यानंतर काही ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत पार्थिव पुन्हा संशयितांच्या घरासमोर नेले. जोपर्यंत हल्लेखोरांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
अंत्यसंस्कार थांबविण्यात आल्याचे आणि स्मशानभूमीतून पार्थिव परत गावात आणल्याचे समजातच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. गावात तणाव निर्माण झाल्याने मोठा पोलीस फौजफाटा गावात तैनात करण्यात आला. या दरम्यान बंद पाळून घडल्या प्रकाराचा निषेध नोंदवला. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी गावात धाव घेत संशयित तिघांना पोलिसांनी अटक केल्याचे सांगत संशयितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, कुणालाही सोडले जाणार नाही, असे आश्वासन देत गावकऱ्यांची समजूत घातली. यानंतर पार्थिवावर विधीनुसार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, घटना घडल्यानंतर रविवारीच पोलिसांनी विकास बंडू घळगे (वय ३५), क्षितिज ऊर्फ आप्पा शशिकांत कांबळे (वय २८) व आदित्य शंकर घळगे (वय २२, सर्व रा. अंकली) या तिघांना अटक केली असून, तिघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असल्याचे निरीक्षक चौगुले यांनी सांगितले.