सांंगली : महाविकास आघाडीची उमेदवारी ठाकरे शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांनाच अंतिम झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. तर याबाबत काँग्रेसचे विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. प्राप्त परिस्थितीवर दोन दिवसात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविकास आघाडीच्या मुंबईतील संयुक्त पत्रकार बैठकीमध्ये सांगलीची जागा ठाकरे शिवसेनेसाठी काँग्रेसने सोडली असल्याचे जाहीर होताच मतदारसंघात काँग्रेसमधून तीव्र संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. कालपर्यंत पक्षाचे वरिष्ठ नेते सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळेल असा विश्‍वास व्यक्त करत असताना अखेर ही जागा मविआमध्ये ठाकरे शिवसेनेला जाहीर करण्यात आल्याने विशाल पाटील यांच्याबाबत सहानभुती निर्माण झाली आहे. कोणत्याही स्थितीत त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेच पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना असून तसे आवाहन समाज माध्यमामधून व्यक्त केले जात आहे. २००९ मधील विधानसभा निवडणुकीवेळी आघाडीच्या जागा वाटपात जतची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यानंतर जत तालुका काँग्रेस बरखास्त करून भाजपचा उमेदवार विजयी झाला. त्याच पद्धतीने जत पॅटर्ननुसार यावेळीही विशाल पाटील यांची उमेदवारी दाखल करून महाविकास आघाडीला धक्का देण्यात यावा, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, काँग्रेसला सांगली मतदारसंघात अनुकूल वातावरण असताना ठाकरे शिवसेनेने सांगलीसाठीच हट्ट का केला हे अनाकलनीय असून यामुळे कार्यकर्त्यामध्ये संतप्त भावना आहेत. पुढे कोणती भूमिका घ्यायची यावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात येणार आहे. पक्षाकडून विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा अखेरपर्यंत आग्रह धरण्यात आला होता. दिल्लीभेटीवेळीही श्रेष्ठींनी उमेदवारीसाठी अनुकूलता दर्शवली होती. तसेच वेळप्रसंगी मैत्रीपूर्ण लढतीचाही प्रस्ताव ठेवण्यात आला होता, तरीही महाविकास आघाडीत अखेरचे दान ठाकरे शिवसेनेच्या बाजूनेच पडले. येत्या दोन दिवसात पुढची दिशा निश्‍चित केली जाईल.

हेही वाचा – सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले

हेही वाचा – सोलापुरात भाजपचे राम सातपुते यांचा प्रचार मराठा आंदोलकांनी रोखला

उमेदवारी दाखल करणार- आमदार विक्रम सावंत

विशाल पाटील यांचे एक अपक्ष व एक काँग्रेसकडून असे दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील आणि अंतिम निर्णय उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी म्हणजे दि. १९ मार्च रोजी घेण्यात येईल असेही आमदार सावंत यांनी सांगितले.

मविआचेच नुकसान – मेंढे

महाविकास आघाडीतून काँग्रेसचे विशाल पाटील यांनाच उमेदवारी अपेक्षित असताना अचानकपणे ठाकरे शिवसेनेकडून दबावाचे राजकारण करत उमेदवारी मिळवली असून ही बाब काँग्रेस कार्यकर्त्यांना मान्य होण्यासारखी नाही. यामुळे लोकांनी विशाल पाटील यांच्यासाठी हातात घेतलेली निवडणूक भाजपला पोषक ठरणारी आहे. – संजय मेंढे, मिरज शहर काँग्रेस अध्यक्ष

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli as soon as mahavikas aghadi candidature was announced to chandrahar patil congress was angry next decision in the meeting mla sawant ssb
First published on: 09-04-2024 at 19:06 IST