सांगली : लाड-पागे समितीच्या शिफारशींची संपूर्ण अंमलबजावणी महापालिकेत करण्यात यावी. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करून मागासवर्गीय कर्मचारी, अधिकारी यांना प्रशासनाने लाभ द्यावा, असे आवाहन अनुसूचित जाती जमातीचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी बुधवारी सांगलीत केले.
लोखंडे यांनी बुधवारी महापालिकेत मागासवर्गीयांना नियमानुसार मिळणाऱ्या निधीतून कोणती कामे झाली, कोणती प्रलंबित आहेत याची माहिती घेतली. या वेळी आयुक्त सत्यम गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. मागासवर्गीय निधीतून होणाऱ्या कामाची माहिती घेत असताना प्रशासनात कार्यरत मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबतही माहिती घेतली.
तसेच श्री. लोखंडे यांनी मंगळवारी इस्लामपूर व आष्टा नगरपालिकेत आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) पर्यावरणासाठी घातक असून, त्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.
इस्लामपूर व त्यानंतर आष्टा नगर परिषदेतील सभागृहात आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी इस्लामपूर येथील बैठकीत मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, उपमुख्याधिकारी डॉ. भगवान खाडे, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे वरिष्ठ सहायक ए. के. शेख तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
या वेळी श्री. लोखंडे यांनी महसूलाचे एकूण ५ टक्के निधी आस्थापना, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाचा मागील ५ वर्षांचा आढावा तसेच अनुसूचित जातीजमातीसाठी प्राप्त होणाऱ्या निधीबाबतचा सविस्तर आढावा घेतला.
श्री. लोखंडे यांनी नगर परिषदेकडील आरोग्य, आवास योजना, आस्थापना, लेखा आदी विभागांचा आढावा घेऊन सफाई कामगार व त्यांची रिक्त पदभरती करण्याबाबत संवाद साधला. सफाई कामगारांना मिळणाऱ्या सोयीसुविधांबाबत माहिती जाणून घेऊन साफसफाईची कामे करताना आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. नगर परिषदेच्या प्रशासकीय कामकाजाबाबत काही अडीअडचणी असल्यास त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत त्यांनी आश्वासित केले. या वेळी त्यांनी निर्माण केलेली संविधानाविषयी माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली.
प्रास्ताविकात मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी नगर परिषदेच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. आष्टा येथे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी आष्टा नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली.