दिगंबर शिंदे

सांगली : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राज्यात चर्चेचा विषय ठरलेला सांगली मतदारसंघ शिवसेनेकडे (ठाकरे गट) गेल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. तर या निर्णयापाठोपाठ काँग्रेसचे जिल्ह्यातील मोठे नेते संपर्काच्या बाहेर गेले आहेत. दरम्यान काँग्रेसने अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी नाहीतर या निवडणुकीतून बाहेर पडावे अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे.

पुढील दोन दिवसांत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.  आघाडीच्या जागा वाटपात आज ही जागा ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील  नेते सध्या पुणे, मंबईत असल्याने अन्य नेत्यांच्या बैठकीत या निर्णयाचे पडसाद उमटल्याचे पाहण्यास मिळाले. कोणत्याही स्थितीत त्यांनी अपक्ष म्हणून िरगणात उतरलेच पाहिजे, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. या वेळी विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत या जागा वाटपाचा निषेध केला.

जत प्रारुपाचा दाखला

दरम्यान जागावाटपातील या अन्यायाच्या विरोधात काँग्रेसने अपक्ष निवडणूक लढवावी नाहीतर या निवडणुकीवर बहिष्कार घालावा, अशी मागणीही कार्यकर्त्यांमधून होत आहे. २००९ मधील विधानसभा निवडणुकीवेळी आघाडीच्या जागा वाटपात जतची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यानंतर जत तालुका काँग्रेस बरखास्त करून निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. त्याच पध्दतीने ‘जत पॅटर्न’नुसार यावेळीही विशाल पाटील यांची उमेदवारी दाखल करावी नाहीतर बहिष्कार घालत आघाडीला धक्का देण्यात यावा, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>>महिला वकिलासोबत ३६ तासांचा Video कॉल, नार्कोटिक्स चाचणीची बतावणी आणि नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करून खंडणीची मागणी!

विशाल पाटील यांनी प्रचाराचे नेतृत्व करावे – चंद्रहार पाटील

झालं, गेलं गंगेला मिळालं, आता माझ्या प्रचाराचे नेतृत्व विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी करावे, असे आवाहन मविआचे अधिकृत उमेदवार महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले. पाटील म्हणाले, की उमेदवारीसाठी आग्रह धरणे कार्यकर्ता म्हणून ठीकच आहे. त्यांच्याबाबत माझ्या मनात कधीच कटुता नव्हती. जर मविआने काँग्रेसला उमेदवारी दिली असती तर मी खुल्या मनाने त्यांचा प्रचार करण्यासाठी पुढाकार घेतला असता.

सांगली काँग्रेसला अनुकूल वातावरण असताना ठाकरे गटाने हट्ट का केला हे अनाकलनीय आहे. विशाल पाटील यांचे एक अपक्ष व एक काँग्रेसकडून असे दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरले असून अंतिम निर्णय अखेरच्या क्षणी म्हणजे १९ एप्रिल रोजी घेण्यात येईल. – विक्रम सावंत, , आमदार  काँग्रेस जिल्हाध्यक्ष

 महाविकास आघाडीतून काँग्रेसचे विशाल पाटील यांनाच उमेदवारी अपेक्षित असताना अचानकपणे ठाकरे गटाकडून दबावाचे राजकारण करत उमेदवारी मिळवली आहे. ही बाब काँग्रेस कार्यकर्त्यांना मान्य होण्यासारखी नाही. यामुळे लोकांनी विशाल पाटील यांच्यासाठी हातात घेतलेली निवडणूक भाजपला पोषक ठरणारी झाली आहे. – संजय मेंढे, मिरज शहर काँग्रेस अध्यक्ष