सांगली : बालगंधर्व यांच्या कारकीर्दींची सुरूवात झालेल्या मिरजेतील बालगधर्व नाट्यगृहासाठी अनुदान मिळावे अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार डॉ. विनय कोरे व प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली.
शिराळा तालुक्याची जागतिक स्तरावर वेगळी ओळख असलेल्या नागपंचमीला जिवंत सर्प प्रदर्शनास परवानगी मिळवून देण्यात मंत्री शेलार यांचा मोठा वाटा आहे. याबद्दल त्यांचा शिराळा तालुक्याच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सत्यजित देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हा बँकेचे संचालक राहूल महाडिक आदी उपस्थित होते.
सांगली ही नाटकांची पंंढरी अशी ओळख आहे. या ठिकाणी नाट्य कलेला राजाश्रय व लोकाश्रय मिळाला आहे. बालगंधर्व यांनी अभिनयाची सुरूवात मिरजेतील संस्थानकालीन हंसप्रभा या नाट्यगृहात केली. या नाट्यगृहाचा ताबा सध्या महापालिकेकडे आहे. महापालिकेने या नाट्यगृहाचे नूतनीकरण केल्यानंतर लता मंगेशकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सध्या नाट्यगृह सुरू असले तरी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासाठी ऐतिहासिक वारसा असलेल्या या नाट्यगृहासाठी विशेष निधीची गरज आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून हा विशेष निधी मिळावा अशी नाट्यप्रेमींची मागणी असून याचा शासनाने विचार करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या प्रसंगी मंत्री शेलार यांची आमदार कोरे व कदम यांनी भेट घेऊन मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहासाठी विशेष अनुदानाची मागणी करणारे निवेदन दिले. बालगंधर्व यांच्या अभिनयाची सुरूवात मिरजेत असलेल्या तत्कालिन हंसप्रभा नाट्यगृहातून झाली. यामुळे या नाट्यगृहाला ऐतिहासिक महत्व असल्याने विशेष अनुदान मिळाले तर निश्चितपणे या नाट्यगृहाची अधिक सुधारणा आणि दर्जेदारपणा निर्माण होउ शकतो. नाट्यगृहाचे सांस्कृतिक महत्व लक्षात घेउन विशेष बाब म्हणून अनुदान मिळावे अशी मागणी त्यांनी केली. यावर सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन मंत्री शेलार यांनी दिल्याचे कदम यांनी सांगितले.