सांगली : खानापूरमधील ओढ्याकाठी असलेल्या शिवमंदिरातील नंदीची विटंबना करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे आठवडी बाजाराचा दिवस असतानाही गावातील दुकाने, व्यवहार बंद ठेवण्यात आले. मंदिराजवळ व गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

खानापूर गावात पापनाशिनी ओढा पात्रालगत महादेवाचे पुरातन मंदिर आहे. मंदिर बंदिस्त असून, पुढील बाजूस नंदी व गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे. आज गावातील शिवभक्त नेहमीप्रमाणे मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर मंदिर आवारातील नंदीची मोडतोड करण्यात आल्याचा प्रकार नजरेस पडला. अज्ञातांनी नंदीच्या शिंगांची मोडतोड केली असल्याची माहिती समजताच एकच गर्दी मंदिर परिसरात जमा झाली.

घडल्या प्रकारामुळे गावातील शिवप्रतिष्ठान, सकल हिंदू समाज, शिवसेना कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. हा प्रकार समजताच खानापूर दूरपरिक्षेत्र पोलीस ठाण्याचे कर्मचारी, विटा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत स्थिती नियंत्रणात आणली. विटंबना करण्यात आलेल्या नंदीच्या मूर्तीवर पांढरे वस्त्र लपेटण्यात आले असून, मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेबद्दल गुन्हा दाखल करून समाजकंटकाचा शोध घेतला जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्याने निर्माण झालेला तणाव निवळला असला तरी गावात तणावपूर्ण शांतता आहे. गावात हिंदू-मुस्लिम समाज एकोप्याने वास्तव्य करत असून, पिढ्यानपिढ्या उभय समाजात ऐक्य असताना असा प्रकार झालाच कसा, असा प्रश्न पडला आहे.