आघाडीला २१ पैकी १७ जागा; भाजपला चार ठिकाणी यश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली :  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये विकास महाआघाडीने २१ पैकी १७ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले असले तरी भाजप प्रणीत पॅनेलनेही चार जागा जिंकून आपले अस्तित्व कायम असल्याचे सिद्ध केले. या  निवडणुकीत सर्वाधिक नुकसान काँग्रेसचे झाल्याचे प्रथमदर्शनी वाटत असताना शिवसेनेला बोनस दोन जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीची संख्यात्मक ताकद कमी झाल्याचे दिसत असले तरी बँकेच्या कारभारावर प्रामुख्याने पालकमंत्री जयंत पाटील यांचाच शब्द अंतिम राहतो की मागील वेळेप्रमाणे होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ही निवडणूक अविरोध करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाले. सहकारात राजकारण असू नये यासाठी पालकमंत्री पाटील यांनी तयारी दर्शवली होती. मात्र, या प्रयत्नाना काँग्रेसचे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी नकार देत, महाविकास आघाडीच्या माध्यमातून पॅनेल करून निवडणूक लढवली तर आम्ही तुमच्यासोबत अन्यथा वेगळा विचार करण्याची भूमिका घेतल्याने सर्वपक्षिय पॅनेलचा मार्ग बंद झाला. जागा वाटपात राष्ट्रवादीला अकरा, काँग्रेसला सात आणि शिवसेनेला तीन जागा मिळाल्या. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपली त्यावेळी प्रत्येक घटक पक्षाची एक जागा अशा तीन जागा अविरोध निवडून आल्या. यामुळे बँकेच्या निवडणुकीत आघाडीचेच वर्चस्व राहणार हे स्पष्ट झाले होते.

आ. मानसिंगराव नाईक, आ. अनिल बाबर आणि महेंद्र लाड या तीन जागा अविरोध आल्याने भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनेलच्या नेत्यांनी अधिक ताकदीने ही निवडणूक लढवली. मर्यादित मतदार असल्याने प्रत्येक नेत्याला आपल्या ताकदीचा अंदाज असतानाही चार जागा महाविकास आघाडीला गमवाव्या लागल्या. जशी भाजपला आटपाडीची जागा गमवावी लागली तशी आघाडीला जतची जागा गमवावी लागली. जतचे आमदार विक्रम सावंत यांचा पराभव काँग्रेसच्या विशेषत: राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या जिव्हारी लागणारा असेल यात शंका नाही.  आ. सावंत यांना पराभूत करण्यासाठी जतमध्ये राष्ट्रवादीची कुमक भाजपच्या कामी आली.

बँकेच्या मागील निवडणुकीमध्ये आ. सावंत यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांचे पुत्र विद्यमान सभापती मनोज जगताप यांचा धक्कादायक पराभव केला होता. या पराभवाचे उट्टे काढत असताना जगतापांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या प्रकाश जमदाडे यांना मैदानात उतरवून आपली आजही ताकद जत तालुक्यात असल्याचे सिध्द केले आहे. याच बरोबर भाजपला आटपाडीतील माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी केलेला पराभव पुढील वाटचालीची दिशा दाखविणारा ठरणार आहे. पंचायत समितीवर देशमुख गटाचे वर्चस्व असताना हा पराभव झाला आहे.

या  निवडणुकीत वसंतदादांच्या घराण्यातील दोन उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी मिरज तालुका विकास सोसायटी गटातून दणदणीत विजय संपादन केला आहे, तर माजी मंत्री स्व. मदन  पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनीही महिला गटात विजय मिळवला आहे.

सहकारात राजकारण असू नये अशी आमची भूमिका होती. भाजपने ताकदीने ही निवडणूक लढवली. पालकमंत्री जयंत पाटील यांनी समन्वयाची भूमिका घेतली होती. मात्र काही मंडळींनी निवडणूक लादली. मात्र, यापुढे बँकेचा कारभार राजकारण विरहित चालावा यासाठी आमची समन्वयाची भूमिका राहील – पृथ्वीराज देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये मित्रपक्षाने आघाडी धर्म पाळला नाही. यामुळे पराभव झाला असला तरी काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. आघाडीला १७ जागा मिळाल्या असल्याने काँग्रेस सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास सक्षम राहील. मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे.- आ. विक्रम सावंत, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्रित निवडणूक लढवली. या निवडणुकीत आघाडीचे १७ उमेदवार जिंकले आहेत. यामुळे महाविकास आघाडीवर मतदारांनी विश्वास व्यक्त केला असल्याचे यावरून स्पष्ट होते

जयंत पाटील, पालकमंत्री

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli district co operative bank election congress ncp shiv sena alliance win 17 seat zws
First published on: 24-11-2021 at 00:36 IST