सांगली : गणेशोत्सव व पैगंबर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीमध्ये प्रखर व अतितीक्ष्ण प्रकाशकिरणाच्या विद्युत रोषणाईवर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बंदी घातली आहे. तर पोलिसांच्या वाहनावर बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यातून मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जाहीर केले.

जिल्हाधिकारी काकडे यांनी दिलेल्या आदेशात जिल्ह्यात २५ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत सर्व प्रकारच्या सार्वजनिक मिरवणुकीमध्ये अतितीक्ष्ण प्रकाश किरणे असलेल्या प्लाझ्मा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे. अन्यथा पोलीस विभागाने आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशात म्हटले आहे.

जिल्ह्यात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव व ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद (महंमद पैगंबर जयंती) हा सण साजरा केला जाणार आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात मिरवणुका होतात. या मिरवणुकांमध्ये प्लाझ्मा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईट्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. प्लाझ्मा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे रस्त्यावरून जाणारे वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन मिरवणुकीमध्ये जावू शकते व त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणूक पाहण्यास आलेली लहान मुले, नागरिक यांच्या डोळ्यास इजा होवून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

तसेच उत्सवातील मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तावरील वाहनावर कॅमेरे बसविण्यात आले असून, यावर मिरवणुकीतील दृष्य चित्रित करण्यात येणार आहेत. मिरवणुकीत अनुचित प्रकार आढळल्यास अशा व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक श्री. घुगे यांनी दिला आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाची जोरदार तयारी कार्यकर्त्यांकडून सुरू असून, मंडप उभारणीचे कामही वेगात सुरू आहे. सांगलीतील काही मर्यादित मंडळाकडून यंदा हलते देखावे उभारण्यात येत असून, यासाठी प्रामुख्याने पाकिस्तान विरोधात करण्यात आलेल्या सिंदूर या लष्करी कारवाईची क्षणचित्रे प्रदर्शित करण्याचे प्रयत्न मंडळाकडून सुरू आहेत. गणेश मूर्ती तयार करणारे कारागिरांची लगबग सुरू असून, अंतिम रंग देण्याचे काम वेगात सुरू आहे. कार्यकर्त्यांकडून कार्यशाळेत श्रींची मूर्ती निश्चित करण्याचे कार्यही सुरू आहे. घरगुती गणेश मूर्तीच्या विक्रीसाठी सांगलीतील जिल्हा बँकेच्या समोरील सेवा रस्त्यावर स्टॉल उभारणी करण्यात आली असून, ग्रामीण भागातील मूर्तीकार या ठिकाणी मूर्ती विक्रीसाठी ठेवतात.