सांगली : अवेळी पडणारा पाऊस, बदलते निसर्ग चक्र ही अलीकडच्या काळातील नित्याची बाब असली तरी जिल्ह्यात निर्माण झालेल्या सिंचन योजनामुळे वर्षभरात दरडोई उत्पन्नामध्ये तब्बल १४.६३ टक्क्यानी वृद्धी झाली आहे. सेवाक्षेत्रापेक्षा सिंचन वृद्धीमुळे कृषी क्षेत्रात वाढ झाली असली तरी नव्याने निर्माण झालेले राष्ट्रीय महामार्ग आणि मंजूर असलेला पुणे-बंगळूरु हरित महामार्ग याचा कृषी-औद्योगिक वाढीसाठी चांगला उपयोग होऊ शकेल. विस्तारित म्हैसाळ आणि टेंभू योजनेमुळे प्रगतीची दारे दुष्काळी भागाला खुणावत असल्याचे चित्र सध्या आहे.

सांगली जिल्ह्याचे नैसर्गिक दोन विभाग असून, पश्चिम भागात बारमाही वाहणाऱ्या कृष्णा-वारणा नद्यांचा सुपीक भाग व अल्प पावसाचा पूर्वकडील भाग. मात्र, गेल्या दोन दशकांमध्ये ताकारी, टेंभू, म्हैसाळ आणि आरफळ योजनेतून पाण्याची उपलब्धता झाल्याने पूर्व भागातील माळरानेही आता हिरव्या पिकांनी डोलू लागले आहेत. औद्याोगिक प्रगतीमध्ये सहकारी, खासगी क्षेत्रातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून उद्यामशीलता दिसत असली तरी औद्याोगिक वसाहतीमध्ये कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे कोणतेही मोठे प्रकल्प नाहीत.

शेतीमध्ये ऊस पिकांनी पश्चिम भाग सधन झाला असून द्राक्ष, डाळिंब पिकांनी दुष्काळी भागाला गेल्या काही वर्षांत प्रगतीच्या वाटेवर आणले आहे. जागतिक पातळीवर ‘टरमरिक सिटी’ म्हणजेच ‘हळदीचे गाव’ म्हणून सांगलीची ओळख आहे. भारतीय परंपरेने हळदीला मानाचे स्थान दिले आहे, ते औषधी म्हणून. यामुळे सांगलीच्या बाजारातील हळदीच्या दरावर जागतिक पातळीवर या पिवळ्या सोन्याचे दर निश्चित होतात. सांगलीचे अर्थकारणच हळद, ऊस आणि बेदाणा या तीन उत्पादनावर अवलंबून आहे. हळदीची खरेदी-विक्री करणारी देशपातळीवरील सर्वांत मोठी बाजारपेठ सांगलीत असल्याने हळदीवर प्रक्रिया करणारे कारखाने या ठिकाणी आहेत.

हेही वाचा >>> साताऱ्याची आरोग्य क्षेत्रातही भरारी

राज्यात लोकसंख्या व भौगोलिक क्षेत्रामध्ये सांगलीचा १६ वा क्रमांक आहे. तर लोकसंख्येची घनता दर किलोमीटरला ३२९ (राज्याची ३६५) आहे. एकूण लोकसंख्येपैकी ७४.५० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. सिंचनाच्या वाढलेल्या सुविधांमुळे भांडवली उत्पादन वाढले आहे. दरडोई उत्पन्न १ लाख ६६ हजार ५२५ रुपयांवरून एक वर्षामध्ये १ लाख ९५ हजार ६२ रुपये झाले. म्हणजे सिंचन सुविधा वाढल्याने दरडोई उत्पन्नामध्ये तब्बल १४.६३ टक्क्यांनी वाढ झाली. वाढत्या जलसिंचन सुविधा, शेती उत्पादनात होत असलेली वाढ या प्रगतीच्या संधी असल्या तरी कृषीपूरक उद्याोगाच्या वाढीसाठी भरपूर वाव आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस बळ अत्यल्प

नव्याने तयार झालेले महामार्ग अणि दुष्काळी टापूतून जात असलेला पुणे- बंगळुरू हरित महामार्ग विकासाला पोषक ठरणार आहे. जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस दलात मनुष्यबळ अत्यल्प म्हणजे ३० लाखांहून अधिक लोकसंख्येसाठी अडीच हजार आहे. तरीही सातत्यपूर्ण कारवाईमुळे गुन्हेगारीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. खून, मारामारी, दुखापत, बलात्कार या प्रकारातील गेल्या वर्षी ५३१ गुन्हे दाखल झाले होते. यावेळी यामध्ये घट होऊन ४२६ गुन्हे दाखल झाले. तर मालमत्तेविषयीचे म्हणजे दरोडा, चोरी, घरफोडी या गुन्ह्यांमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत १३३ कमी गुन्हे घडले. यामागे पोलीस दलाचे सातत्यपूर्ण काम महत्त्वाचे ठरले.