सांगली : जुलैमध्ये प्रतियुनिट उणे ६५ पैसे असलेला अधिभार ऑगस्टमध्ये अधिक ३५ पैसे लावत वीज दरात प्रतियुनिट एक रुपया वाढ करण्यात आली आहे. महावितरणने वीज ग्राहकांची फसवणूक केली असल्याचा आरोप राज्य वीज ग्राहक संघटनेचे सदस्य किरण तारळेकर यांनी शुक्रवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. श्री. तारळेकर यांनी सांगितले, महावितरणची अतिरिक्त वीज गळती, गलथान कारभार व नियामक आयोगाच्या धरसोड धोरणामुळे राज्यात जुलैपासून वाढलेले वीज दर लपविण्यासाठी महावितरणने जुलैच्या वीज बिलात विविध वर्गाच्या ग्राहक वर्गवारीनुसार उणे २४ ते उणे ६५ पैसे इंधन अधिभाराची आकारणी केली होती.

उच्च दाब ग्राहकांना जुलैमध्ये उणे ६५ पैसे असलेला अधिभार ऑगस्टच्या देयकात ३५ पैसे आकारण्यात आला असून, यामुळे लाखो युनिटचा वापर करणारे उच्च दाब ग्राहकांना एक महिन्यात तब्बल १ रुपया प्रति युनिटच्या दरवाढीने लाखो रुपयांचा जबर फटका बसलेला आहे.

२७ अश्वशक्तिच्या आतील छोट्या यंत्रमाग ग्राहकांना जुलैमध्ये उणे २५ पैसे आकारणी केली होती, ती आता १२ पैसे युनिटला आकारली आहे. अर्थात प्रती युनिट २३७ पैसे अतिरिक्त दरवाढ लादली गेली आहे. राज्य शासन व महावितरणने वीज ग्राहकांची दिशाभूल केली आहे. ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलैपासून राज्यातील वीज दर कमी होणार असल्याची घोषणा केली असली तरी वाढीव दराने ग्राहकांना देयके आली असल्याने ही वस्तुस्थिती समोर आली आहे. वीज वितरण व राज्य शासनाने वीज ग्राहकांची फसवणूक केली असल्याचा आरोप श्री. तारळेकर यांनी केला.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणच्या पंचवार्षिक दरवाढ याचिकेवर मार्च २०२५ च्या अखेरीस महावितरणची नियमबाह्य वीज गळती नामंजुर करीत वीज ग्राहकांना दिलासा देणारा आदेश जाहीर केला होता. मात्र महावितरणने या निकालावर फेरविचार याचिका दाखल केल्याने नियामक आयोगाने आपल्याच आदेशाला स्थगिती देऊन २५ जुन २०२५ रोजी दिलासा मागे घेत नविन दरवाढ मंजुर करणारा फेर निकाल दिला व ही दरवाढ १ जुलै २०२५ पासुन लागु झाली.

या पार्श्वभुमीवर जुलै २०२५ च्या बिलात व्यापारी ,औद्योगीक या सर्व ग्राहकांना स्थिर आकारात,उर्जा आकारात व टीओडी आकारात प्रतीमहिना वीज भारानुसार वाढच झाली होती.मात्र प्रत्यक्षात वीज दर वाढ झाली असली तरी ती ग्राहकांच्या लगेचच लक्षात येऊ नये व त्यावर ग्राहकांकडून तिव्र प्रतिक्रिया येऊ नये यासाठी महावितरण व अप्रत्यक्ष शासनाने चलाखी केली. यापूर्वी युनिटला शुन्य पैसे असलेला इंधन अधिभार जुलैच्या बिलात आणखी कमी करुन तो औद्योगीक ग्राहकांना वर्गवारीनुसार उणे (मायनस) २४ ते ६५ पैसे लावला होता.

दरम्यान आता ॲागस्ट २०२५ ची वीज बिले ग्राहकांना वितरीत झाली असुन २७ अश्वशक्तीच्या आतील लघुदाब ग्राहकांना उणे २५ ऐवजी +१२ पैसे अर्थात ३७ पैसे वाढ तर उच्च दाब ग्राहकांना उणे ६५ पैसे इंधनअधिभारात वाढ करुन तो +३५ पैसे युनिटला आकरल्याचे दिसत आहे. याचा सरळ अर्थ आहे की उच्चदाबग्राहकांना एका महिन्यात प्रती युनिटला तब्बल १ रु अतिरीक्त दरवाढ लादली गेली असुन या दरवाढीने लाखो युनिट वापर करणाऱ्या उद्योगक्षेत्राचे कंबरडे मोडणार आहे.महावीतरणची अतिरीक्त गळती व अकार्यक्षम कारभाराचा मोठा फटका वीज ग्राहकांना बसत आहे.एका बाजुला अमेरीकन टेरीफ वाढीने वस्त्रोद्योगासह सर्वच उद्योग क्षेत्रात आपला निर्यातक्षम माल कुठे विकायचा ही चिंता असताना राज्य शासनाच्या या झटक्याने व उत्पादन खर्चाची वाढीने उद्योग क्षेत्रातून कमालीची चिंता व्यक्त केली जात आहे.