सांगली : दसऱ्याच्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या शोभेची दारू तयार करत असताना कवठेएकंद (ता. तासगाव) येथे रविवारी दारूचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

एका मंडळाचे कार्यकर्ते दारू तयार करत असताना अचानक तयार दारूने पेट घेतल्याने स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये आशुतोष बाळासाहेब पाटील (वय १६), आनंद नारायण यादव (वय ५५), विवेक आनंदराव पाटील (वय ३८), गजानन शिवाजी यादव (वय २८), अंकुश शामराव घोडके (वय २१), प्रणव रवींद्र आराधे (वय २१), ओमकार रवींद्र सुतार (वय २१) आणि सौरभ सुहास कुलकर्णी (वय २७) हे आठ जण भाजून जखमी झाले आहेत. यापैकी दोघांना किरकोळ दुखापत झाली असून अन्य सहा जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या दोघांची प्रकृती चिंंताजनक असल्याचे सांगण्यात आले. सर्व जखमींवर सांगलीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

गावातील ब्राह्मण गल्लीमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये दारू तयार करण्याचे काम सुरू होते. दारूची चाचणी घेत असताना अचानक स्फोट होऊन तयार झालेल्या दारूने पेट घेतला. यावेळी ही दुर्घटना घडली. यात वरील आठ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवले.

आठ वर्षांपूर्वी दसऱ्याच्या आदल्या दिवशीच लाकडी शिंगटात दारू भरत असताना दारूचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी दारू तयार करण्यावर प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, परंपरा असल्याचे सांगत गावकऱ्यांनी याला विरोध केला. मात्र, अत्यंत घातकी असणारे पत्री बाण तयार करण्यावर आणि त्याचे प्रदर्शन करण्यावर बंधने आणण्यात आली आहेत.

गावात दसऱ्यानिमित्त निघणाऱ्या ग्रामदैवत बिऱ्हाड सिध्द पालखीसमोर शोभेच्या दारूचे प्रदर्शन करण्याची प्रथा आहे. अनेक दारू शोभा मंंडळाकडून शोभेच्या दारूचे विविध कला प्रकार रात्रभर सादर केले जातात. मानकरी चव्हाण-पाटील यांच्या हस्ते आपटा पूजनानंतर दसऱ्याच्या दिवशी ग्रामदैवत बिऱ्हाड सिध्द यांची पालखी अन्य मानकऱ्यांसमवेत गावातील देवघरे यांच्या घरी भेटीसाठी निघते. यावेळी पालखीसमोर दारू काम केले जाते.

पालखी निघाल्यानंतर मंदिर परिसरात नवसाने औटकाम करून सलामी देण्याची पध्दत आहे. यानंतर पालखी मार्गावर ठिकठिकाणी दारूची वेस बांधणी करून वेगवेगळ्या पध्दतीचे दारूकाम प्रदर्शित करण्याची पध्दत आहे. यामध्ये वेसवरील बाण, फुगडी, मोर, दांडपट्टा, झाड, शिंगट यांचे दारूकाम केले जाते. आकाशात उडणाऱ्या औटमध्ये ताज्या घडामोडीवर दारूचे प्रदर्शन केले जाते. यामध्ये पाकिस्तानविरुध्द करण्यात आलेल्या सिंदूर कारवाईचेही प्रदर्शन केले जाणार आहे.