सांगली : सांगली जिल्ह्याचा राज्यामध्ये करोना लसीकरणामध्ये १२ ते १४ वयोगटामध्ये पहिला तर १५ ते १८ वयोगटामध्ये तिसरा क्रमांक असून नव्याने बाधित रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी सर्वानीच दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड लसीकरण समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, महानगरपालिका वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

डॉ. चौधरी म्हणाले, की जिल्ह्यात करोना लसीकरण मोहिमेमध्ये लोकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. १२ ते १४ वर्षे वयोगटातील शालेय व शालाबाह्य ९३ हजार ४७७ बालकांपैकी  ७८ हजार ४५८ बालकांनी लसीची पहिली मात्रा तर ३८ हजार ९७२ बालकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील शालेय व शालाबाह्य १ लाख ४४ हजार ६१७  बालकांपैकी १ लाख ४३ हजार १२९ बालकांनी पहिली तर १ लाख २१ हजार ७२ बालकांनी लसीकरणाची दुसरी मात्रा घेतली आहे. १८ वर्षे वयोगटावरील २१ लाख ८० हजार नागरिकांपैकी २१ लाख १ हजार ५५८ नागरिकांनी पहिली तर १८ लाख ९५ हजार २७ नागरिकांनी लसीकरणाची दुसरी मात्रा घेतली आहे. 

जिल्ह्यातील ५७ हजार ९८९ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीची वर्धक मात्रा घेतली आहे.  सांगली जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरण जलदगतीने होण्यासाठी कमी लसीकरण झालेल्या  ९० गावांची निवड करून या गावांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये या गावांमध्ये १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.