सांगली: पश्चिम घाटातील धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सांगलीत कृष्णा, वारणा काठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सांगलीतील बुधवारी सकाळी ९१ कुटंबांनी स्थलांतर केले. वारणा नदीला आलेल्या पूरामुळे सहा पूल पाण्याखाली गेले असून वाहतूक बंद केली आहे. सांगली, मिरज शहरातील नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत पाणी आल्याने कुपवाड स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. औदुंबरच्या दत्तमंदिरात पाणी आल्याने श्रींच्या पादुका सुरक्षित ठिकाणी नेऊन पूजा करण्यात आली.
बुधवारी ११ वाजता आयर्विन पूलाजवळ आणखी पातळी ३५ फूट ९ इंच झाली असून शहरातील सुर्यवंशी, इनामदार प्लॉट, काकानगर, दत्तनगर परिसरात पूराचे पाणी शिरले असून येथील नागरिक स्थलांतर करत आहेत. ९१ कुटुंबातील ४७१ नागरिकांनी स्थलांतर केले आहे.
जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील बहे, बोरगाव, नागठाणे, डिग्रज, सांगली, म्हैसाळ आणि राजापूर (जि.कोल्हापूर) बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच शिराळा तालुक्यातील चरण सोंडोली,आरळा शित्तुर, बिळाशी भेडसगाव, मांगले सावर्डे,मांगले कांदे आणि कांदे सावर्डे हे वारणेवरील पुल पाण्याखाली गेले आहेत, यामुळे वाहतुक बंद केली असल्याने अडथळे उभा करून वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिराळा ते शाहूवाडी मार्ग बंद झाला आहे.सांगली कर्नाळ रस्त्यावर अडथळा उभा करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कृष्णा नदीचे पूर पाणी इशारा पातळी कडे जात असून नागरिकांनी वाढती पाणी पातळी लक्ष्यात घेऊन वेळेत स्थलांतरित व्हावे, कोणतीही हानी होऊ नये या साठी प्रशासन सतर्क आहे असे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले. मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट ,इनामदार प्लॉट , कर्नाळ चौक परिसरातील नागरिकांना स्थलांतरीत होण्यासाठी वारंवार प्रशासन सूचना देत आहे .आयुक्त गांधी यांनी पाहणी करून आवश्यक त्या साहित्य सह स्थलांतर होण्याबाबत सूचना दिल्या आहेत, पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्र सर्व सोयींनी युक्त आहेत, स्थलांतरीत पूर बधितांसाठी महापालिकेच्यावतीने योग्य काळजी घेतली जात आहे, तरी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.