सांगली : पश्चिम घाटातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने कोयना व चांदोली धरणातील विसर्गात वाढ करण्यात आली आहे. यामुळे कृष्णा, वारणा नद्या दुथडी भरून वाहत शिराळा तालुक्यातील काखे मांगले पूल तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला. नदीकाठी सतर्क राहण्याचा इशारा आज जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसांपासून पश्चिम घाट परिसरात गेल्या २४ तासांत कोयना येथे १३६, महाबळेश्वर येथे १४२, नवजा येथे १३९ आणि चांदोलीमध्ये ८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे धरणात पाण्याची आवक मोठी आहे. कोयनेत ९३.७७ आणि चांदोलीत ३३.२७ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी मंगळवारी सायंकाळपासून धरणाचे दरवाजे सव्वाफूट वर उचलून सांडव्यातून १० हजार तर पायथा विद्युतगृहातून २१०० क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात येत असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. तसेच चांदोली धरणातून सायंकाळी पाच वाजल्यापासून सांडव्याद्वारे २४३० आणि विद्युत जनित्रामधून १४३५ असा ३ हजार ८६५ क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे.

हेही वाचा – सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक

हेही वाचा – पंढरपूर: चंद्रभागा धोक्याच्या पातळीकडे; पूरसदृश स्थिती कायम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामुळे वारणा आणि कृष्णा नदीची पाणी पातळी वाढणार आहे. धरणातील सोडण्यात येत असलेले पाणी आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस यामुळे कृष्णा, वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कडेगाव, विटा परिसरात पडत असलेल्या पावसाने येरळा नदीही दुथडी भरून वाहत आहे. यामुळे शिराळा तालुक्यातील काखे-मांगले दरम्यानचा पूल आणि येरळा नदीवरील नांद्रे ब्रह्मनाळ पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
रात्रीच्या पावसानंतर जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असून अधूनमधून मोठ्या सरी येत आहेत. मात्र पावसाचा जोर थोडा ओसरला असला तरी थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी गोळा होत आहे. मुरमाड राने, डोंगरकपारीतून पाझर सुटले असल्याने ओढेनाले दुथडी भरून वाहत आहेत.