सांगली : कोयना धरणातून अद्याप विसर्ग सुरू केलेला नसतानाही गेले चार दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीतील पाणी पातळी वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासात कृष्णेची पाणीपातळी दहा फुटांनी वाढली असून चांदोली धरणात पाण्याने सांडवा पातळी गाठल्याने विसर्ग केला जाणार असल्याने वारणा काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासात जिल्ह्याचा पूर्व भाग वगळता सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून वाळवा तालुक्याच्या काही भागात अतिवृष्टी झाली आहे. काल सायंकाळी पाच वाजल्यापासून कृष्णा नदीतील पाणीपातळी झपाट्याने वाढत असून आज सकाळी कृष्णेचे पाणी औदुंबरातील दत्त मंदिरात पोहोचले. चांदोली धरणातील पाणीसाठा गतीने वाढत असून सांडवा पातळीपर्यंत पोहोचले आहे. धरणातील साठा नियंत्रित राखण्यासाठी चक्राकार दरवाजातून नदीपात्रात केव्हाही विसर्ग करण्यात येईल, तरी वारणाकाठी राहणार्‍या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन धरण व्यवस्थापनाकडून सोमवारी करण्यात आले आहे. चांदोली धरणात आज सकाळी आठ वाजता २६.८१ टीएमसी पाणीसाठा झाला असून १ हजार ५९२ क्युसेकचा विसर्ग सध्या करण्यात येत आहे. तर कोयनेतील पाणीसाठा ६०.४३ टीएमसी झाला आहे.

हेही वाचा – Ajit Pawar : गुलाबी राजकारणामागे दडलंय काय? बॅनरपासून जॅकेटपर्यंत एकच रंग का? महिलेच्या प्रश्नावर अजित पवारांचं खास उत्तर

गेल्या २४ तासात वाळवा तालुक्यात ताकारी आणि बहे मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या ठिकाणी १२५.८ मिलीमीटर पाऊस एका दिवसात झाला. तर शिराळा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ७७.८ मिलीमीटर नोंदला गेला असल्याची माहिती पूरनियंत्रण कक्षातून देण्यात आली. शिराळ्यात मडळ निहाय झालेला पाउस कोकरूड ७२.३, शिराळा ६६, शिरसी ६५.५, मांगले ७९.५, सागाव ७८.५ आणि चरण १०४,८ मिलीमीटर झाला. यामुळे वारणा नदीला पूर आला असून अनेक ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. ऐतवडे, काखे मांगले पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा – सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पुढील महिनाभराच्या पावसावर उजनीचे भवितव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात सरासरी २८.२ मि. मी. पावसाची नोंद झाली असून अन्य तालुक्यांत झालेला पाऊस असा – मिरज २१.५, जत २, खानापूर-विटा १२.१, वाळवा-इस्लामपूर ६०.८, तासगाव १४.१, आटपाडी २.४, कवठेमहांकाळ ७.६, पलूस ३२.३ आणि कडेगाव २२.७ मिलीमीटर.