सांंगली : वडिलांच्या नावासोबतच आईचेही नाव आवश्यक ठरवत मंत्र्यांच्या दालनाबाहेर वडिलांच्या नावासोबत आईच्या नावाचे फलक झळकले. मात्र याचा गावातील महिलांना कितपत अधिकार मिळणार हे गुलदस्त्यात असताना देविखिंडी (ता.खानापूर) ग्रामपंचायतीने गावठाण मालमत्ता पती-पत्नीच्या संयुक्त नावे करण्याचा निर्णय घेऊन या निर्णयाची अंमलबजावणी केली. तसा ठराव करून पती-पत्नीचे संयुक्त नाव ग्रामपंचायतीच्या आठ-अ उतार्‍यावर लावणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

देविखिंडी (ता. खानापूर) या गावचा उंबरा १ हजार २१४ असून डोंगरी प्रवर्गातील या गावाची लोकसंख्या २ हजार २१२ आहे. गावात महिलांची संख्या १ हजार १६९ असून एकूण लोकसंख्येच्या तुलनेत महिलांची टक्केवारी ५३ टक्के आहे. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी त्यांना पतीच्या मालमत्तेमध्ये समान हक्क देणे ही मुलभूत गरज आहे. त्यामुळे स्त्रियांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी त्यांच्या असलेल्या घरांची नोंद पती- पत्नी या दोघांच्या नावे असणे आवश्यक असल्याचे मत देविखिंडीतील अनेकांनी व्यक्त केले. याची दखल घेत तत्कालीन सरपंच रुक्मिणी निकम, उपसरपंच प्रकाश निकम, ग्रामसेवक सोमनाथ सपाटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेत पहिल्यांदा हा ठराव मंजूर केला. या ठरावाला ग्रामसभेनेही एकमताने मंजूर दिली. हरकतीसाठी मुदतही देण्यात आली. मात्र, या निर्णयाला कोणीही हरकत घेतली नाही.

हेही वाचा – मी उमेदवार आहे माझ्याशी भिडा; वडिलांवर कसली टीका करता ? प्रणिती शिंदेंचे राम सातपुतेंना आव्हान

हेही वाचा – महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

हेही वाचा – विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

गावठाणामध्ये १ हजार २१४ मिळकती नोंद असून यापैकी पात्र असलेल्या ९०६ मिळकती पती-पत्नीच्या संयुक्त नावाने करण्यात आल्या आहेत. गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत मिळकतीच्या आठ अ उतार्‍याचे वाटप पती-पत्नीला संयुक्तपणे करण्यात आले.