सांगली : गेल्या पंधरा दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र दमदार हजेरी लावली. पश्चिम भागापेक्षा दुष्काळी भागात दमदार पाऊस झाला. सकाळी दहा वाजेपर्यंत संततधार सुरू असलेल्या पावसाने दुपारी विश्रांती घेतली. उघडिपीच्या काळात खरीप पिकातील आंतरमशागतीचे काम शेतकऱ्यांनी आटोपले असून, दमदार पावसाने पिकाला जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यातील चांदोली धरणात आज सकाळी आठ वाजेपर्यंत २८.८१ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.
मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाचे जून मध्यापासून प्रमाण कमी झाले. जुलै महिन्यात पावसाने सरासरीपर्यंत मजल गाठली असली, तरी सातत्य अभावानेच आढळले. मे महिन्यात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने जमिनीत ओल झाली, ओढे नाले वाहते झाले. मात्र, यानंतर जुलैअखेरपर्यंंत मोठा पाऊस अभावानेच झाला होता. यामुळे खरीप पिकाची वाढ थंडावली होती. जुलैमध्ये मिळालेल्या उघडिपीच्या काळात पिकामध्ये आंतरमशागतीची कामे करण्यास मोकळीक मिळाली असली, तरी रानात पिकासाठी आवश्यक असलेल्या पावसाचा अभाव जाणवत होता.
मात्र, बुधवारी पहाटे तीन वाजल्यापासून दमदार पाऊस झाला असून, सकाळी १० वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. यामुळे सकाळी मजुरांबरोबरच शाळकरी मुलांची तारांबळ उडाली. शहरात शाळेसाठी जाणाऱ्या अनेक मुलांनी आज शाळेला दांडी मारण्यास प्राधान्य दिले.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ११.२ मिमी पावसाची नोंद झाली असून, जत तालुक्यात सर्वाधिक २८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जत, मुचंडी व डफळापूर या मंडळात ४०, तर उमदी मंडळात ४६.८ मिमी पाऊस झाला. या तुलनेत जिल्ह्याचे कोकण अशी ओळख असलेल्या शिराळा तालुक्यात सरासरी ४.३ मिमी पावसाची नोंद झाली.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे : मिरज ६.९, जत २८.५, खानापूर-विटा ६.५, वाळवा-इस्लामपूर ५.९, तासगाव ८.६, शिराळा ४.३, आटपाडी १४.५, कवठेमहांकाळ ८.१, पलूस ८.९ आणि कडेगाव १९.३.
जिल्ह्यातील चांदोली धरणात आज सकाळी आठ वाजेपर्यंत २८.८१ टीएमसी पाणीसाठा असून, या धरणाची साठवणक्षमता ३४.४० टीएमसी इतकी आहे. तर, कोयना धरणातील साठा ८७.४५ टीएमसी (क्षमता १०५.२५) झाला आहे. चांदोली व कोयना धरणातील विसर्ग थांबवण्यात आल्याने कृष्णा नदीतील पाणीपातळी आयर्विन पुलाजवळ बुधवारी सकाळी १२ फुटांपर्यंत उतरली आहे.