सांगली : आटपाडी बाजार समितीच्या सौद्यामध्ये सोमवारी डाळिंबाला प्रतिकिलो ३११ रुपयांचा या हंगामातील विक्रमी दर मिळाला. आंब्याचा हंगाम संपल्यानंतर नव्याने बाजारात डाळिंबाची आवक होऊ लागली असून, डाळिंबाला चांगली मागणी आणि चढा दर मिळत असल्याने उत्पादक समाधानी आहेत. प्रतिकिलो ३११ रुपये दर मिळताच शेतकऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

आटपाडी बाजार समितीतील मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर्समध्ये डाळिंबाला विक्रमी दर मिळाला. आटपाडी बाजार समिती डाळिंब सौदे बाजारात आवक वाढली आहे. सध्या दररोज ४ ते ५ हजार क्रेटची आवक होत आहे. आटपाडीसह सांगोला, अकलूज, नातेपुते, माळशिरस, दौंड, इंदापूर, अहमदनगर, अक्कलकोट, तसेच कर्नाटकातील विजापूर व बेळगाव परिसरातून दर्जेदार डाळिंब येत आहे.

आटपाडी बाजार समितीच्या आवारात सौदे बाजारात मागणी वाढल्यामुळे डाळिंबाचे भावही सातत्याने वाढत आहेत. श्रावण महिन्यातील उपवास सुरू आहेत. त्यामुळे दर्जेदार डाळिंबाला मागणी वाढली आहे. चांगला दर आणि मालाचा उठाव होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. बाजार समितीमध्ये सोमवारी झालेल्या सौदे बाजारात रवींद्र गायकवाड, गुरसाळे यांच्या डाळिंबाला प्रतवारीनुसार प्रतिकिलो ७२, १०२, १६४ व ३११ रुपये दर मिळाला. पिलीव येथील रामचंद्र भैस यांच्या मालाला ९१, ११०, १७१, २५१ रुपये; विठ्ठल फडतरे, भगतवाडी यांच्या मालाला ८०, १००, १७०, २११ रुपये दर मिळाला. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या डाळिंबाला ८०, ११०, १६१, २०० रुपये दर मिळाला.

डाळिंबाला प्रतवारीनुसार प्रतिकिलो ७२ पासून ३११ रुपयांपर्यंत दर मिळाला. चांगल्या उत्पादनाला चांगला भाव मिळतो आहे. देशभरातील बाजारपेठेत आटपाडीचा माल पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. चांगल्या मालाबरोबर हवामान बदलामुळे खराब झालेल्या मालालाही योग्य भाव मिळावा असा प्रयत्न आहे. व्यापारी वर्गाला इथे आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आटपाडीतील अडत व्यापारी पंढरीनाथ नागणे यांनी सांगितले.

दरम्यान बाजार समितीत आधुनिक सुखसोयी आणि पारदर्शक कारभार यामुळे बाजार तेजीत आहे. आपला माल थेट आटपाडी बाजारात आणा आणि योग्य दराचा लाभ घ्यावा असे आवाहन आटपाडी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी केले. दरम्यान डाळिंबाला चांगली मागणी आणि चढा दर मिळत असल्याने उत्पादक समाधानी आहेत. प्रतिकिलो ३११ रुपये दर मिळताच शेतकऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.