सांगली : महापालिकेने शंभर फुटी रस्त्यावरील २२५ हून अधिक अतिक्रमणे जेसीबीच्या मदतीने हटविल्याने रस्ता वाहतुकीसाठी प्रशस्त झाला आहे.अतिक्रमण हटवत असताना अल्पसा विरोध मोडीत काढून ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमणात पत्र्याचे शेड, जीना, वाढीव बांधकाम हटविण्यात आली असून ही कारवाई यापुढेही सुरूच राहील असा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी दिला आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अडथळे, पादचारी मार्गावरील अतिक्रमणे व व्यावसायिक अनधिकृत बांधकामे दूर करण्याच्या उद्देशाने आज १०० फुटी रोड परिसरात व्यापक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. यावेळी आयुक्त गांधी जातीने उपस्थित होते. मोहीम प्रभावी व्हावी म्हणून दोन स्वतंत्र, प्रशिक्षित आणि सुसज्ज पथकांची रचना करण्यात आली होती.
अतिरिक्त राहूल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली शंभर फुटी रस्त्यावरील दिगंबर मेडिकल ते कोल्हापूर रस्ता या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर यांच्या पथकाने ९ मोठे खुल्या जागेतील पत्राशेड, २० अनधिकृत डिजिटल/जाहिरात फलक, ३ अनधिकृत जिने (रस्त्यावर वाढवलेले), १५ विविध प्रकारचे पत्रा शेड हटविण्यात आले.
दुसर्या पथकाने रस्त्याच्या पूर्व दिशेला असलेली अतिक्रमणे दूर केली. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिक्षक नागार्जुन मद्रासी यांच्या पथकाने अतिक्रमण करून बांधलेले १० बाय १५ फूट आकाराचे पाच व्यावसायिक गाळे, डायमंड हॉटेल परिसरातील ७० फूट लांबीचा अनाधिकृत कट्टा, त्रिमूर्ती चौकातील १५ पत्र्याचे शेड, ४० अनाधिकृत फलक, वाचनालयाची अनाधिकृत संरक्षण भिंत, व अन्य वाहतुकीस अडथळा ठरणारी बांधकामे जेसीबीच्या मदतीने उध्वस्त करण्यात आली.
या कारवाईमुळे संपूर्ण मार्ग आता अधिक रुंद, स्वच्छ व वाहतुकीसाठी सुलभ झाला आहे. मात्र, अतिक्रमण हटवत असताना काही व्यावसायिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिकेने मे २०२५ मध्येच अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस बजावली होती.
अतिक्रमण हटवत असताना काही व्यावसायिकांनी माजी नगरसेवकांशी संपर्क साधला. माजी नगरसेवकांनी येउन आयुक्त गांधी यांना अतिक्रमण हटविण्यासाठी मुदत देण्याची विनंती केली. मात्र, आयुक्तांनी याला नकार देत अतिक्रमण दूर करण्याचे काम सुरूच ठेवण्याचे आदेश दिले. या परिसरात वाहन दुरूस्तीचा उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. बरेच व्यावसायिक रस्त्याच्या बाजू पट्ट्यावर व्यवसाय करत होते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. अतिक्रमण काढल्याने हा रस्ता आता रहदारीस रूंद झाला आहे.
