सत्ता हस्तगत करण्याचा भाजपचा निर्धार; काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, प्रथमच काँग्रेसेतर पक्ष म्हणून भाजपाने महापालिकेची सत्ता हस्तगत करण्याचा चंग बांधला असून यासाठी गेल्या तीन-चार महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. समविचारी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र एकत्र लढण्याऐवजी मत्रीपूर्ण लढतीच्या तयारीत दिसत आहेत. यामुळे बहुसंख्य ठिकाणी तिरंगी लढतीची शक्यता सध्या तरी दिसत आहे.

महापालिका निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवरून सुरू झाली असून प्रभाग रचना अंतिम करण्यात आल्याने इच्छुकांनी आपली मोच्रेबांधणी सुरू केली आहे. समोर कोण असेल यापेक्षा आपण कसे श्रेष्ठ  आहोत हे सांगण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवार करीत आहेत. अद्याप कोणता झेंडा हाती घ्यायचा? हे निश्चित नसताना अनेक इच्छुकांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करीत आणली असून आपले नाव मतदारापर्यंत पोहचविण्यासाठी छापील मजकूर असलेली पत्रके वाटण्यास प्रारंभही झाला आहे.

प्रथमच प्रभाग मोठे असल्याने इच्छुकांची धावपळ होत आहे. २५ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग आणि त्यात चार नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे एकसंघ प्रचार करण्याची गरज निर्माण झाली  आहे.

महापालिकेत सध्या काँग्रेसची सत्ता असली तरी यावेळी काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती असलेल्या नेत्याची उणिव भासत आहे. कारण गेल्यावेळी सगळी सूत्रे स्व. मदन पाटील यांच्याकडे होती. जेष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनीही आपले योगदान दिले होते. यावेळी मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याकडे नेतृत्व असले तरी ते एकमुखी आहे असे म्हणता येणार नाही. श्रीमती पाटील यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत. वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील विधानसभा नजरेसमोर ठेवून महापालिकेत आपला गट मदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. कदम गटाचे महापालिका क्षेत्रात फारसे अस्तित्व दिसत नसले तरी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे आपला गट निर्माण करून विधानसभेची तयारी करीत आहेत. काँग्रेसने यावेळी सामुहिक नेतृत्वाचा कौल घेउन उमेदवारी निश्चिती करण्याचा निर्णय घेतला आहे तो यामुळेच.

राष्ट्रवादी काँग्रेस हा महापालिकेतील दुसरा मोठा गट. सत्तेचा प्रबळ दावेदार असला तरी याचे एकमुखी नेतृत्व महापालिका क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत निर्माण होऊ शकले नाही. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी आपला गट बांधण्याचा प्रयत्न केला, त्याला विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील यांनी खो देण्याचा केलेला प्रयत्न हा इतिहास जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर इतिहासजमा झाला असला तरी वाद मिटले का, हा प्रश्न आहेच. पक्ष एकसंघपणे निवडणुकीला सामोरा जाणार आहे का, असे प्रश्न निर्माण होत आहेत.

राष्ट्रवादीसाठी आमदार जयंत पाटील हे प्रभाग निहाय बठका घेत आहेत. गल्ली बोळातील कार्यकर्त्यांशी एकीकडे चर्चा करीत असताना पूर्णपणे नवखे उमेदवार देऊन जुगार खेळण्याचा प्रयत्न पाटील यांचा सुरू आहे. त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर होमपिचवरच या महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची परीक्षा होत आहे. यामुळे त्यांची पावले सावध आहेत. एकीकडे काँग्रेसला न दुखावता समविचारींनी एकत्र यावे असे सांगत असतानाच त्यांची स्वबळाची तयारीही सुरू आहे. राज्य पातळीवरील पद मिळाल्याने राष्ट्रवादीमध्ये जी पक्षत्यागाची चर्चा सुरू होती ती आता थांबली असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही पडझड झाली तरच अन्यथा पक्षांतर्गत मोट बांधण्यात पाटील हे बऱ्यापकी यशस्वी होत असल्याचे चित्र आहे.

आमदार पाटील यांना दुहेरी लढत द्यावी लागणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे. एकीकडे भाजपाला तीव्र आणि टोकाचा विरोध करीत असताना भाजपामध्ये असलेल्या मित्रांचे काय करायचे हा प्रश्न आहेच. कारण आज भाजपाच्या तंबूत असलेले बरेचजण आमदार पाटील यांच्या पंगतीला बसणारी मंडळीच होती. दुसरीकडे समविचारी म्हणून काँगेसला जवळ करीत असताना पारंपरिक विरोधकांना जागा दाखविण्याचे कामही करावे लागणार आहे.

भाजपाने महापालिकेची सत्ता कोणत्याही स्थितीत हस्तगत करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या भेटवस्तूंचे वाटपही सुरू झाले आहे. अगदी पलूस-कडेगाव निवडणुकीची आचारसंहिता असताना हे वाटप खुले आम सुरू होते. याचबरोबर आ. सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नातून शहराच्या विविध भागात होत असलेल्या रस्ते विकासाचे काम हे भांडवल घेऊन भाजप सामोरे जाण्याच्या तयारीत आहे.

भाजपाची मूळची ताकद महापालिका स्वबळावर आणण्याइतपत नाही हे वास्तव आहे. सांगली, मिरज शहरात जरी भाजपाचे आमदार असले आणि खासदारही भाजपाचे असले तरी यासाठी मिळालेली कुमक ही परपक्षियाकडूनच होती. कुणाचे तरी हिशोब चुकते करायचे होते म्हणून ही कुमक मिळाली हे विद्यमान लोकप्रतिनिधींना ज्ञात आहेच. यामुळे ही महापालिका निवडणुक भाजपाच्या लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने कसोटीचा काळ आहे. यासाठी पक्षाचे जे निष्ठावंत आहेत त्यांना सध्या सबुरीचे धोरण स्वीकारा असा सल्ला दिला जात असून निवडून येण्याची क्षमता हाच निकष भाजपाने उमेदवारीसाठी ठेवला आहे. यासाठी अन्य पक्षातून तयार  नेतृत्व घेण्याची तयारी ठेवली आहे. काँग्रेसचा एक गट भाजपाच्या तंबूत डेरेदाखल झाला असून या गटाच्या पक्षप्रवेशासाठी आमदार सुरेश खाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गेल्या आठवडय़ात जत दौऱ्यात चर्चा करून होकारही मिळविला आहे.

बुद्धीवादी, अभ्यासक, जेष्ठ नागरिक आणि तरुण यांना विचारून शहराच्या विकासाचे व्हीजन नजरेसमोर ठेवून आम्ही जनतेला आश्वासित करण्याचा प्रयत्न करणार असून जुन्या सदस्यांच्या अनुभवाचा लाभ देत असतानाच नवे चेहरे, तरुण यांना महापालिकेत काम करण्याची संधी देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली असल्याचे सांगून पुन्हा संधी जनतेकडे मागणार आहोत.

पृथ्वीराज पाटील, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष.

राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली २००८ मध्ये महापालिकेची सत्ता महाआघाडीच्या माध्यमातून राबविली. त्यावेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा आज शहराला होत आहे. ड्रेनेज योजना, रस्त्यांचे रूंदीकरण, वसंतदादा समाधीस्थळाचा विकास आदी ठळक बाबी असून यावेळी लोकांनाच काय अपेक्षित आहे तसा अजेंठा ठेवून सामोरे जात आहोत. भाजपाला रोखण्यासाठी समविचारी ताकद एकसंघ व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

संजय बजाज, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष

सांगली व मिरज शहराने भाजपाला दोन आमदार दिले आहेत. या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न भाजपाने केला असून याच मुद्द्यावर आम्ही महापालिकेची सत्ता मागणार आहोत. सध्या शहरात बदलाचे वातावरण असून पूर्ण ताकदीने आम्ही मदानात उतरत आहे. पक्षाकडे आतापर्यंत ३५० जणांनी उमेदवारी मागितली असून यावरूनच पक्षाला चांगले वातावरण असल्याचे स्पष्ट होतो.

– शेखर इनामदार, सदस्य प्रदेश भाजपा कार्यकारिणी.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli municipal corporation election
First published on: 29-05-2018 at 04:09 IST