|| दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली महापालिकेवर आरोप; नागरिकांच्या आरोग्याला धोका

सांगली :  दहा  किलोमीटर परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल असतानाही महापालिकेने बेडग रस्त्यावर कत्तलखाना सुरूच ठेवण्याचा निर्धार केला असल्याचे नुकत्याच झालेल्या ठरावावरून स्पष्ट होते. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा विरोध  डावलून आर्थिक साखळीतून हा कत्तलखाना सुरूच ठेवण्याचा अट्टहास नजीकच्या काळात गंभीर प्रश्नाला आमंत्रण देणारा आहे.

महापालिकेने मिरज बेडग रस्त्यावर वड्डी गावच्या हददीमध्ये कत्तलखाना सुरू करून दोन दशकाचा कालावधी झाला. या ठिकाणी जनावरांची कत्तल करण्यासाठी  आणि उपलब्ध मांस, हाडे व अन्य प्राणिजन्य पदार्थाची विक्री करण्यासाठी ठेका दिला आहे. याच परिसरात जैविक भस्मीकरण केंद्रही सुरू करण्यात आले होते. मात्र सध्या ते बंद आहे, याचबरोबर शहराच्या परिसरात संकलित  होणारा कचरा टाकण्यासाठी सांगलीमध्ये समडोळी आणि मिरजमध्ये बेडग डेपोचा वापर करण्यात येतो. याचा त्रास या परिसरातील रहिवाशांना होतो आहे.

याबाबत वेळोवेळी पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये विरोध नोंदविण्यात आला असला तरी या विरोधाची दखल घ्यावी असे महापालिकेच्या आरोग्य  विभागाला वाटत नाही. याचबरोबर यासंदर्भात मिरज तालुका आरोग्य विभागाने नकारात्मक अहवाल सादर करूनही जिल्हा प्रशासनाला त्याची दखल  घेण्याची गरज वाटत नाही. यामागे मोठे अर्थकारण असल्याची जोरदार चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत या कत्तलखान्यात काही जागा ठेकेदाराला नाममात्र दरामध्ये मृत जनावरांच्या अस्थी, चर्म यांच्या साठवणुकीसाठी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यासाठी वड्डी ग्रामपंचायतीचा बोगस ठरावही जोडण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून ग्रामसेविका प्रशिक्षणासाठी गेलेल्या तारखेचा दाखला कसा जोडला गेला याचे उत्तर शोधायला गेले तर यामागील अर्थकारण लक्षात येईल.

या कत्तलखान्यामुळे दुर्गंधी आणि धुराच्या लोटामुळे परिसरासह अनेक गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मनपाने मिरज-बेडग रोडवर कोटय़वधी रुपये खर्चून अद्ययावत कत्तलखाना उभा केला आहे.  सध्यस्थितीला तो काही अटींवर मुंबई येथील एका ठेकेदारास भाडेतत्वावर चालविण्यास देण्यात आला आहे. शहरातील मोठय़ा जनावरांच्या कत्तली बंद व्हाव्यात, हा कत्तलखाना उभारण्यामागील हेतू होता.

कत्तलखान्याशिवाय तेथे अनेक विभाग बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये हाडांवरील प्रक्रियेपासून जैविक भस्मीकरण सारख्या अनेक प्रकारांचा समावेश आहे. कत्तलीसाठी येणारया जनावरांची आरोग्य तपासणी केवळ कागदावरच आहे. मनपा कत्तलखाना निरीक्षकाचा तर येथे पत्ताच नसतो.     मोकाट कुत्र्यांचा मोठया प्रमाणात वावर वाढला आहे. या कुत्र्यांनी आत्तापर्यंत अनेकांवर हल्ला करून जखमी केले आहे. शिवाय एका बालिकेचा बळीही घेतला आहे. लगतच मनपाने कचरा डेपोही सुरू करुन ग्रामस्थांच्या त्रासात भरच घातली आहे.    ग्रामीण भागाचे सत्तास्थान असलेल्या मिरज पंचायत समितीमधून या कत्तलखान्यातील गरप्रकाराविरूध्द अनेकवेळा आवाज उठला. कत्तलखान्यापासून होणारा त्रास आणि तो बंद करण्यासाठी अनेक ठरावही झाले. पण, त्याकडे मनपा प्रशासनाने मात्र कानाडोळाच केला.

 

बेडग कत्तलखाना सुरू ठेवण्यापूर्वी आरोग्य विभागाच्या अहवालाचा विचार व्हावा अशी आमची मागणी आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हरित न्यायालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन केले जात नाही, तर कत्तलखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देत असताना ज्या अटी घातल्या आहेत, त्याचे पालन ठेकेदाराकडून होते की नाही हे पाहण्यास महापालिका  दुर्लक्ष करीत आहे. परिसरातील रहिवाशांचे आरोग्य महत्वाचे की  व्यवसाय महत्वाचा असा आमचा सवाल आहे. – अनिल आमटावणे, पंचायत समिती सदस्य मिरज

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli municipality accused of risking public health akp
First published on: 18-03-2020 at 00:02 IST