जिवंत नागपूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या बत्तीस शिराळा येथे प्रतिकात्मक नागपूजा करून आज (मंगळवार) नागपंचमी साधेपणाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने ५० पेक्षा अधिक मंडळाकडून वाद्यांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून प्रतिकात्मक नागाच्या मिरवणुका काढण्यात आल्या.

जिवंत नागपूजेसाठी शिराळा येथे २००२ पासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्प हाताळणी, प्रदर्शन यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे प्रतिकात्मक नागपूजा करून यंदाचा उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी ग्रामदैवत अंबाबाई मंदिरामध्ये प्रतिकात्मक नागपूजा आटोपल्यानंतर देवीची पालखी काढण्यात आली. यानंतर मंडळाच्या सार्वजनिक मिरवणुकांना प्रारंभ करण्यात आला.

पोलीस प्रशासन, वन विभागाचे बारकाईन लक्ष –

न्यायालयीन आदेशाचा भंग होऊ नये यासाठी वन विभागाचे सुमारे १२५ कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले यांच्या नेतृत्वाखाली ५०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. वन विभागाने शहरात विविध १२ ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेराद्बारे मिरवणुकीवर लक्ष ठेवले होते.तसेच ड्रोन कॅमेर्‍याच्या माध्यमातूनही सर्प हाताळणी होते का यावर नजर ठेवली जात होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिरवण्कीमुळे आवाजाची मर्यादा उल्लंघन होणार नाही अशी हमी मंडळाकडून घेण्यात आली असतानाही अनेक मिरवणुकीमध्ये मात्र, डीजेचा वापर करण्यात आला होता. २०१९ मध्ये आलेला महापूर आणि गेली दोन वर्षे करोना महामारीमुळे या उत्सवावर निर्बंध होते. यावेळी करोना निर्बंध हटविण्यात आल्याने उत्साह अमाप पाहण्यास मिळाला.