राज्यात लॉकडाऊनदरम्यान केवळ अत्यावश्यक बाबींकरताच घराबाहेर पडण्यास मुभा असताना नागरिक काहीतरी कारणं सांगून वाहनं घेऊन रस्त्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंगळवारी सकळापासून कडक करवाईला सुरुवात केली असून अशा लोकांची वाहनंच जप्त करण्यात येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर त्याचा आज सातवा दिवस आहे. तत्पूर्वी तीन दिवस आधी जनता कर्फ्युनंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली होती. अशा गेल्या आठ-नऊ दिवसांपासून लोक घरातच बसून आहेत. तर काहीजण घरातून काम करीत आहेत.
मात्र, आता लोकांचा संयम सुटू लागला असून ते गेल्या दोन दिवसांपासून घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, राज्यासह देशभरात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून लोकांना वारंवार अत्यंत महत्वाचं काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरीही लोक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत.
त्याचाच परिणाम सांगली शहरात दिसून येत आहे. आज (मंगळवार) सकाळपासूनच लोक किराणामाल आणि भाजीपाला खरेदीसाठी जात असल्याचे पोलिसांना सांगत आहेत. त्यासाठी ते दुचाकी आणि चारचाकी घेऊन बाहेर पडत आहेत. मात्र, लोक कारणं सांगून घराबाहेर पडत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी आता कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा लोकांच्या गाडया जप्त करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. सकाळी गाड्या ताब्यात घेतल्यानंतर संध्याकाळी ओळखपत्र दाखवल्यानंतर त्या पुन्हा संबंधित मालकाकडे सोपवण्यात येणार आहेत.