सांगली : वैशाखवणव्याचा चटका सहन करत यंदाच्या हंगामात मे महिन्यात सरासरीच्या अडीच पट पाऊस झाला असून जिल्ह्यात गेल्या सात दिवसांत १२७ मिलिमीटर पाऊस झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून गुरुवारी देण्यात आली. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील वाळवा व शिराळा तालुक्यात पाच ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस कामेरी मंडळात ९०.३ मिमी नोंदला गेला. वळीव पावसाने येरळा नदीला पूर आला असून, ओढे-नाले भरून वाहते झाले आहेत.
वीस वर्षांत पहिल्यांदाच वळवाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने सलग चार दिवस पाऊस पडत आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत वाळवा तालुक्यातील वाळवा ७६, कुरळप ६८.८, कामेरी ९०.३, चिकुर्डे ७०.३ आणि कोकरूड (ता. शिराळा) या मंडळात ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या २४ तासांत झालेला तालुकानिहाय पाऊस असा
मिरज १९.५, जत ८.४, खानापूर २२.८, वाळवा ५६.७, तासगाव २३.९, शिराळा ३६.८, आटपाडी १८.१, कवठेमहांकाळ २७, पलूस १९.४ आणि कडेगाव २९.४ मिमी. जिल्ह्यात सरासरी २९.३ मिमी पाऊस झाला आहे. सततच्या पावसाने येरळा नदीला पूर आला असून, भाळवणी ता. कडेगाव येथे पुलाला पाण्याने स्पर्श केला असला तरी अद्याप त्यावरून वाहतूक सुरू आहे. तासगाव तालुक्यातही अनेक ओढ्यांना पूर आला असून, पावसाने ताली फुटल्याने ओढा-नाले यांना अचानक पूर येण्याचे प्रमाण बुधवारपासून वाढले आहे.
तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी गावासह पूर्व भागाला मुसळधार पावसाने झोडपले. या पावसाने रानाच्या ताली फुटून जात सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर गावातील ओढ्या-नाल्यांना पूर येऊन ते दुथडी भरून वाहू लागले, तसेच तासगाव शहरालाही अर्धा ते पाऊण तास संततधार पावसाने झोडपून काढले. जत, आटपाडीवगळता अन्य तालुक्यांतील सर्वच गावांत कमी-अधिक प्रमाणात हा पाऊस पडत होता.
सांगली, मिरज शहरातही पावसाने आज दिवसभर रिपरिप सुरूच ठेवली होती. रात्री सांगलीतील स्टेशन चौक, झुलेलाल चौक, मिरजेत मैदान दत्त मंदिर परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.