सांगली : जिल्ह्यातील ६९६ गावांत ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र उभारण्यात येणार असून, या केंद्रांमार्फत २४ तास हवामानाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. त्याची माहिती शेतकऱ्यांना ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून, त्याचा पीक संरक्षणासाठी उपयोग होणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टीम म्हणजेच विंड्स प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे.

विंड्स प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायत स्तरावर प्राधान्याने शासकीय जागेत स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. यामध्ये मिरज तालुक्यात ६४, तासगाव ६८, कवठेमहांकाळ ५९, जत ११६, खानापूर ६४, आटपाडी ५३, कडेगाव ५४, पलूस ३३, वाळवा ९४ आणि शिराळा तालुक्यात ९१ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

याबाबत जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, ‘नैसर्गिक आपत्तीमुळे नेहमीच पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नुकसानीच्या नोंदी तत्काळ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळत नाही. या सर्व प्रकारावर स्वयंचलित हवामान केंद्रामुळे मात करता येणार आहे. प्रशासनास अतिवृष्टीची अचूक व वेळेत माहिती मिळणार आहे. स्वयंचलित हवामान केंद्रामुळे दैनंदिन पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग याची माहिती वेळेत मिळण्यास मदत होऊन, गावागावांतील नुकसानीचा खरा अहवाल शासकीय यंत्रणेपुढे जलदतेने येण्यास मदत होणार आहे. लवकरच शासनाकडून ही केंद्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू होईल.’

यापूर्वी केवळ महसूल मंडळस्तरावर ही आकडेवारी उपलब्ध होत होती. स्वयंचलित हवामान केंद्रे उभारल्यानंतर ती ग्रामस्तरावर उपलब्ध होणार आहे. या केंद्रांमुळे २४ तास हवामानाचे निरीक्षण होऊन इंटरनेट, मोबाइल ॲपद्वारे वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध होणार आहे. यामध्ये मानवी हस्तक्षेप राहणार नाही. प्रशासनास अतिवृष्टीची अचूक माहिती मिळणार आहे. अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती ग्रामस्तरावर उपलब्ध होणार असल्याने क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत होऊन बाधितांना नुकसानभरपाई तातडीने मिळण्यास मदत होणार आहे.

या केंद्रांमुळे चक्रीवादळ, दुष्काळ, आग, पूर, गारपीट, ढगफुटी, थंडीची लाट इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामानविषयक माहिती ग्रामस्तरावरच उपलब्ध होईल. तसेच, या केंद्रांमुळे पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग या हवामानविषयक घटकांची माहिती प्राप्त होते. या माहितीचा वापर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय प्रणाली, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हवामानविषयक माहितीचे संकलन, विश्लेषण, शेतकऱ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन इत्यादी बाबींसाठी उपयुक्त ठरेल.