सांगली : राज्य शासनाने वीज दर कमी होणार असल्याची घोषणा केली असली, तरी जुलै महिन्याची वितरित करण्यात येत असलेली देयके वाढीवच असल्याचे आणि इतिहासात पहिल्यांदाच इंधन अधिभार उणे करून ग्राहकांची दिशाभूल केली असल्याची टीका वीजग्राहक संघटनेचे सदस्य किरण तारळेकर यांनी गुरुवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली.

वीज नियामक आयोगाच्या आदेशाने वीजवितरण कंपनीची नवीन दरप्रणाली जुलै २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार जुलै महिन्याची देयके आता ग्राहकांना मिळत असून, यामध्ये घरगुती ग्राहकांचे दर अल्प प्रमाणात कमी झाल्याचे दिसत असले, तरी वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांच्या देयकामध्ये वाढ झाल्याचे दिसत असल्याचे श्री. तारळेकर म्हणाले.

घरगुती ग्राहकवगळता व्यापारी, औद्योगिक या सर्व ग्राहकांना स्थिर आकार, ऊर्जा आकार व टीओडी आकार यामध्ये प्रतिमहिना वीजभारानुसार वाढच झाली आहे. शिवाय यापूर्वी केडब्ल्यूएच रीडिंगनुसार होत असलेली देयके आता केव्हीएएच रीडिंगनुसार होणाऱ्या बिलांमुळे खराब वीजपुरवठा फॅक्टरचा भुर्दंड ग्राहकांवर लादला गेला आहे.

यंत्रमागधारकांच्या २७ अश्वशक्तीखालील ग्राहकांना ५२ पैसे दरवाढ लागू झाली आहे. शिवाय मागणी आकारातील प्रतिअश्वशक्ती प्रतिमहिना होणारी वाढ वेगळीच आहे. २० किलोवॉट व त्यावरील जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकांना येणाऱ्या पाच वर्षांत वीज आकारात अनुक्रमे ८६ ते ७३ पैसे युनिटला व मागणी शुल्कात १२ ते ९२ रु. प्रतिमहिना वापरातील वीजभारानुसार दरवाढ लागू झाली आहे. उच्चदाब ग्राहकांना वीज आकारामध्ये ४६ ते ९ पैसे युनिटला वाढ, तर मागणी आकारात ५१ ते २५१ रुपयांपर्यंत वाढ लादली गेली आहे.

वीज दरवाढ ग्राहकाच्या लक्षात येऊ नये यासाठी युनिटला शून्य पैसे असलेला इंधन अधिभार या बिलात आणखी कमी करून तो औद्योगिक ग्राहकांना वर्गवारीनुसार उणे (मायनस) २४ ते ६५ पैसे लावला आहे. खरे तर प्रत्येक महिन्याला इंधन अधिभार कमी-जास्त होत असतो आणि तो किती लागणार, याचे परिपत्रक महिनाअखेरीस जाहीर केले जाते. मात्र, या वेळी कोणतेच परिपत्रक न काढता वाढलेले वीजदर लगेच लक्षात येऊ नये म्हणून वीजग्राहक वर्गवारीनुसार इंधन अधिभार कमी करून वीजग्राहकांची एकप्रकारे दिशाभूल केलेली आहे. इंधन अधिभार सुरू झाल्यापासूनचा इतिहास पाहिला, तर त्याची उणे आकारणी कधीच झालेली नाही, असेही श्री. तारळेकर यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.