शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शाब्दीक हल्ला केला आहे. मुख्यमंत्री दिल्लीत जातात, त्यांना तिथे गुंगीचं औषध दिलं जातं. ती गुंगी उतरली की पुन्हा दिल्लीत जातात. हे सर्व गुंगाराम आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाविषयी बोलायचं नाही. या अटीवर त्यांना सत्तेवर बसवलं आहे. तसेच, शिंदे- फडणवीस सरकार हे नॅनो सरकार आहे. नॅनो गोष्टी फार टीकत नाही. नॅनो गाडीचा कारखानादेखील बंद झाला आहे. असे कारखाने फार चालत नाहीत, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.

संजय राऊतांनी केलेल्या टीकेला आता शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “संजय राऊतांची नॅनो बुद्धी आहे, कारण काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्याची ही दुर्बुद्धी त्यांना सुचली. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा निर्णय घेतला आहे. आम्हाला नॅनो बुद्धीचं म्हणणे म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना नॅनो बुद्धीचं म्हणणं, असा संजय राऊतांच्या विधानाचा अर्थ निघतो. नॅनो कंपनीचा कारखाना बंद पडला, म्हणून सरकार बंद पडत नसते,” असं संजय गायकवाडांनी म्हटलं.

हेही वाचा : ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे’ बानवकुळेंच्या विधानावर अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले, “नाकाखालून आमचं सरकार…”

“मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मंत्रालयात बसून, रस्त्यावर येऊन प्रशासनात काम करून हे सरकार चालत आहे. तुमच्यासारख घरात बसून ऑनलाईन हे सरकार चालत नाही. एकनाथ शिंदे हे काम करणारे आहेत. ते आपलं उत्तर त्यांच्या कामातून देतात. संजय राऊत हे रिकामे आहेत,” असा टोला गायकवाडांनी लगावला आहे.

हेही वाचा : “नाकाखालून सरकार घेतलं की आणखी…”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावरून अजित पवारांची टोलेबाजी!

“संजय राऊतांना वाटतं आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजं. ते रिकामे नाहीत. त्यांनी गुंगींचं औषध घेतलं असेल तर, राऊतांनी पिसाळलेल्या कुत्र्याचं इंजेक्शन घेतलं. त्यामुळे ते पिसाळलेल्या सारखे वागतात,” अशा शब्दांत संजय गायकवाडांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे.