राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (सोमवार) नागुपरात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज (रविवार) महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकारपरिषदही झाली. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. अजित पवारांनी यावेळी सीमाप्रश्न, महापुरुषांचा होणारा अपमान, महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योगधंदे आदी मुद्यांवरून राज्य सरकारवर टीकास्र सोडलं.

यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. आमचं सरकार नाकाखालून गेलं की आणखी कशा खालून गेलं, तो संशोधनाचा भाग आहे. देवेंद्र फडणवीस वेशभूषा बदलून एकनाथ शिंदेंना भेटायला जायचे. ते कसली वेशभूषा करायचे? हे माहीत नाही, असं म्हणत अजित पवारांनी टोलेबाजी केली आहे.

हेही वाचा- “फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

महाविकास आघाडीवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्यांना स्वत:चं सरकार टिकवता आलं नाही. त्यांच्या नाकाखालून आम्ही त्यांचं सरकार घेऊन गेलो आणि सरकार स्थापन केलं. त्यामुळे ते कशाच्या आधारावर वल्गना करत आहेत. हे सरकार टिकणार आहे आणि एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा निवडणूक लढणार आहोत. महाराष्ट्रात पुन्हा आमचंच सरकार येणार आहे,” असं विधान फडणवीसांनी केलं.

हेही वाचा- “आम्ही भविष्य बघायला ज्योतिषाकडे जात नाही”, ‘त्या’ प्रश्नावरून अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विधानाला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, “आता त्यांना काय बोलायचं. त्यांनी नाकाचा उल्लेख केला, हे दुर्दैवी आहे. त्यासाठी प्रत्येकाचं नाक तपासावं लागेल. नाकाची साईज वगैरे बघावी लागेल, पण त्यात मला जायचं नाही. वास्तविक देवेंद्र फडणवीस हेच एकेकाळी म्हणायचे की, एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय अंतर्गत आहे. आमचा बंडखोरीशी काहीही संबंध नाही. नंतर तेच म्हणू लागले की आम्ही बदला घेतला. खरं तर, ज्यादिवशी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, त्या दिवसापासून त्यांना (देवेंद्र फडणवीस) वेदना होत होत्या. त्यादिवसापासूनच ते कामाला लागले होते, हे आता जगजाहीर झालं आहे. त्यामुळे नाकाखालून सरकार घेतलं की आणखी कशा खालून घेतलं? तो संशोधनाचा भाग आहे. ते वेशभूषा बदलून जायचे, ते कसली वेशभूषा करायचे? हे माहीत नाही,” अशा शब्दांत अजित पवारांनी टोलेबाजी केली आहे.