गेल्या तीन पिढीतील घराणेशाहीचा वारसा मोडीत काढीत भाजपाचे संजयकाका पाटील यांनी सांगलीतील काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करीत लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला. या विजयाने जिल्ह्यात पहिल्यांदाच खेडय़ापाडय़ापर्यंत भाजपाचे कमळ पोहचले असून विजयानंतर सांगली, मिरजेसह जत तालुक्याच्या कर्नाटक सीमेपर्यंत फटाक्यांची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विक्रमी मताधिक्याची ऐतिहासिक नोंद करीत भाजपाने यावेळी मिळवलेला विजय राज्यातील सत्ताधारी असणाऱ्या जिल्ह्यातील दिग्गजांच्या दृष्टीने धक्कादायक असला तरी सामान्य मतदारांच्या दृष्टीने ही परिवर्तनाची नांदी आहे.
शुक्रवारी सकाळी सांगली-मिरज रस्त्यावरील अन्न महामंडळाच्या गोदामात मतमोजणी सुरू झाली. सहा विधानसभा मतदारसंघात १० लाख ४६ हजार ६५९ मतदारांनी आपले मत नोंदविले होते. मतमोजणीसाठी ६६६ कर्मचाऱ्यांची ९० टेबलावर नियुक्ती करण्यात आली होती. एकूण २४ फेऱ्यात मतमोजणी करण्यात आली. या शिवाय पोस्टाची मते स्वतंत्रपणे मोजण्यात आली. यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया पार पडली असतानाही मतमोजणीचा निकाल जाहीर करण्यास ८ तासांचा अवधी लागला. िरगणात १७ उमेदवार असल्याने मतमोजणी धिम्या गतीने झाली.
मतमोजणीत पहिल्या फेरीपासून भारतीय जनता पक्षाने घेतलेली आघाडी कायम ठेवीत अंतिम फेरीत तब्बत २ लाख ३९ हजार २९२ इतक्या मताधिक्याने काँग्रेसचे प्रतीक पाटील यांचा पराभव करीत विजय संपादन केला. भाजपाला मतदारसंघातील १७२५ पकी १७२४ मतदान केंद्रांवर मताधिक्य मिळाले. केवळ खानापूर तालुक्यातील गार्डी या एकमेव मतदान केंद्रावर ३०० मताधिक्य काँग्रेसला मिळवता आले. हे गाव राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल बाबर यांचे आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत खुद्द त्यांच्या अंजनी या गावात भाजपाच्या संजयकाका पाटील यांनी ११ मतांचे मताधिक्य पटकाविले आहे.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी मतमोजणीनंतर भाजपाचे संजयकाका पाटील हे विजयी झाले असल्याचे जाहीर केले. या वेळी त्यांनी मतमोजणी केंद्रावरच त्यांचे अभिनंदन केले. भाजपाच्या विजयानंतर सांगली, मिरज या शहरांसह जत, आटपाडी, विटा, पलूस-कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ आदी तालुक्याच्या गावासह उमदी, संख (ता. जत), देशींग, नागज, ढालगाव (ता. कवठेमहांकाळ), मणेराजुरी, चिंचणी, सावळज (ता. तासगाव), दिघंची (ता. आटपाडी) आदी ठिकाणी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली. मोटारसायकलवरून भाजपचे निशाण व भगवा ध्वज नाचवित शहरात तरुणाई रस्त्यावरून धावत होती. जिल्ह्यात विजयाचा जल्लोष साजरा करीत असताना कार्यकर्त्यांकडून आगळीत घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मतमोजणी केंद्रावर स्वत अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तनात होते. तर तालुक्याच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जाहीर मिरवणुकीवर प्रतिबंध घालण्यात आला असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे -संजयकाका पाटील (भाजपा- विजयी)६११५६३, प्रतीक पाटील (काँग्रेस) ३७२२७१, नानासो बंडगर (बसपा) ११३७८, डॉ. नितिन सावगावे (बहुजन मुक्ती पार्टी) ८४०५, अॅड. के. डी. िशदे (जनता दल से.) २४६०, श्रीमती समिना खान (आप) ४६९९, सुरेखा ऊर्फ सुरैय्या शाहीन शेख (महाराष्ट्र विकास आघाडी) ८४९ व अन्य १० अपक्ष.
संग्रहित लेख, दिनांक 17th May 2014 रोजी प्रकाशित
घराणेशाहीचा वारसा मोडीत संजयकाकांचा सांगलीत विजय
गेल्या तीन पिढीतील घराणेशाहीचा वारसा मोडीत काढीत भाजपाचे संजयकाका पाटील यांनी सांगलीतील काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करीत लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला.

First published on: 17-05-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay kakas victory in sangli