Sanjay Mishra on Meeting first time with Raj Thackeray : मराठी रंगभूमीवरील सुवर्णपान ठरलेले, विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आता हिंदी भाषेत रंगभूमीवर अवतरणार आहे. या नाटकात प्रसिद्ध अभिनेते संजय मिश्रा हे नाना फडणवीस आणि अभिनेता संतोष जुवेकर घाशीराम कोतवाल या दोन प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर, अभिजीत पानसे यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. या नाटकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. संजय मिश्रा, संतोष जुवेकर, अभिजीत पानसे हे या नाटकाचं प्रमोशन देखील करत आहेत. अशाच एका प्रमोशनाच्या कार्यक्रमात मिश्रा यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबरच्या भेटीचा किस्सा सांगितला.

संजय मिश्रा यांनी नुकतीच एबीपी माझाच्या ‘माझा कट्ट्या’वर हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले, “अभिजीत पानसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत याची मला सुरुवातीला कल्पना नव्हती. तसेच त्यांच्या पक्षाच्या आग्रही भूमिकांवर माझा आक्षेप नाही. मात्र, याच माणसाने (अभिजीत पानसे) घाशीराम कोतवालसारखं नाटक हिंदी रंगभूमीवर आणलंय ही गोष्ट खरंच कौतुकास्पद आहे.”

अभिजीत मनसेशी संबंधित आहे हे त्याने मला नंतर सांगितलं : मिश्रा

संजय मिश्रा यांना यावेळी विचारण्यात आलं की अभिजीत पानसे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत हे तुम्हाला माहिती होतं का? यावर मिश्रा म्हणाले, “ते मनसेशी संबंधित असल्याचं त्यांनी मला नंतर सांगितलं. परंतु, त्याने मला काहीच फरक पडत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो रित्विक घटक नावाचे एक ख्यातनाम बंगाली दिग्दर्शक होते. ते विचारांनी साम्यवादी होते. परंतु, मला त्यांचे चित्रपट खूप आवडायचे.”

संजय मिश्रा यांनी सांगितला राज ठाकरेंबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा

“या नाटकादरम्यानचा (घाशीराम कोतवाल) एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. एक दिवस राज ठाकरे यांनी आम्हाला भेटायला बोलावलं. त्यांचं मराठीत बोलणं चालू होतं. मी तिथे बसताच राज म्हणाले, ‘संजय आले आहेत आपण हिंदीत बोलुया.’ तसेच अभिजीतबद्दल बोलायचं झाल्यास तो मनसेशी संबंधित आहे. मात्र, घाशीराम कोतवालसारखं नाटक हिंदी रंगभूमीवर आणण्याचं श्रेय देखील त्याचच आहे.”

अभिजित पानसे यांच्याबरोबर भालचंद्र कुबल यांनी घाशीराम कोतवाल या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. तर वसंत देव यांनी हिंदी भाषेत यापूर्वीच या नाटकाच्या संहितेचे लेखन केलं होतं.