गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या कारवाईवरुन महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीकडून दुसऱ्यांदा छापा टाकण्यात आला होता. अशातच आता महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात संजय राऊत यांनी दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणात शेतकऱ्यांची लूट झाली असून निःपक्ष चौकशीची मागणी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.

हेही वाचा – “CM म्हणजे ‘करप्ट माणूस’”, आदित्य ठाकरेंनी सांगितला नवा अर्थ; म्हणाले…

संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटलं?

आपल्या नेतृत्वाखालील सरकारने सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार खणून काढण्याचे ठरवले आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन. भारतीय जनता पक्षाचे काही नेते आपल्या अंतस्थ गोटात वावरत असतात, ते सातत्याने प्रमुख विरोधी पक्षांचे व्यवहार, त्यांच्या साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत आहेत. या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराही लावला आतो. भ्रष्टाचाराचा धर्म व राजकीय पक्ष नसतो. या मताचा मी आहे, असं संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील ‘भीमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षांत केलेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे प्रकरण म्हणजे सरळ सरळ अंदाजे ५०० कोटी रापयांचे “मनी लॉडरिंगचे आहे. कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या सारख कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे आणि तपास यंत्रणांचे छापे पडत आहेत. पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटीच गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे व या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे, असेही राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सरकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता. त्यांच्या कार्यालयात हे प्रकरण संबंधित तक्रारदार घेऊन गेले आहेत. पण किरीट सोमय्या त्या भ्रष्टाचारावर मूग गिळून बसलेत. जनतेच्या पैशांची प्रचंड लुटमार या कारखान्यात झाली आहे. हे सर्व प्रकरण तत्काळ ईडी व सीबीआयच्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर ळारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.