पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा आणि एनडीएच्या विरोधात देशभरातील अनेक विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला ‘इंडिया’ असं नावही देण्यात आलं आहे. जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेऊन विरोधी पक्षांची मोट बांधली आहे. या इंडिया आघाडीत राष्ट्रीय जनता दल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), नॅशनल कॉन्फरन्स, द्रविड मुन्नेत्र कळघमसह देशातले अनेक मोठे पक्ष सहभागी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएकडून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. तर इंडिया आघाडीने अद्याप त्यांचं नेतृत्व कोण करणार याबाबत निर्णय घेतलेला नाही. इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे भाजपासह एनडीएतील पक्ष सातत्याने इंडिया आघाडीवर टीका करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह नितीश कुमार हे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी इच्छूक आहेत. परंतु, याबाबत इंडिया आघाडीत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही.

महाराष्ट्र हे एक मोठं राज्य असून लोकसभेत महाराष्ट्राच्या एकूण ४८ जागा असल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. याबाबत एएनआयने ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्याशी बातचीत केली. उद्धव ठाकरे ‘इंडिया’चा पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतील का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर संजय राऊत आधी मोठ्याने हसले आणि म्हणाले, उद्धव ठाकरे हा एक हिंदुत्ववादी चेहरा आहे, राष्ट्रवादी चेहरा आहे. इंडिया आघाडीची मान्यता मिळेल तो नेता पंतप्रधानपदाचा चेहरा होईल. याबाबत आघाडीची अद्याप बैठक झालेली नाही. आम्ही बैठकीबाहेर असं कोणतंही वक्तव्य करणार नाही ज्यामुळे आमच्या आघाडीत कुठलाही मतभेद निर्माण होईल.

हे ही वाचा >> भारताच्या आणखी एका शत्रूची पाकिस्तानात हत्या, उधमपूर हल्ल्याच्या सूत्रधारावर अज्ञातांनी झाडल्या गोळ्या

ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, त्यांची इच्छा असेल तर त्यावर इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल. ‘इंडिया’ ही एक सर्वांनी मिळून बनवलेली आघाडी आहे. इथे हुकूमशाही चालत नाही. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात एनडीएतही असंच काम केलं जायचं. मी आताच्या एनडीएबद्दल बोलत नाही. कोणत्याही व्यक्तीला पंतप्रधानपदासाठी आघाडीचं नेतृत्व करायचं असेल तर त्यावर चर्चा होईल. हे सत्य आहे की इंडिया आघाडीचा एक चेहरा असायला हवा. त्यात काहीच चुकीचं नाही. आघाडीची पुढची बैठक होईल तेव्हा या विषयावर चर्चा केली जाईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut answer on will uddhav thackeray will face for pm by india alliance asc
First published on: 06-12-2023 at 15:14 IST