पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण गरम झाल्याचे दिसत आहे. विरोधकांकडून या मुद्य्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. शिवेसना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या हत्याप्रकरणावरून पत्रही लिहिले आहे. शिवाय, देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडीतील सभेत केलेल्या एका विधानाचा उल्लेख करत, संजय राऊत यांनी शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून मोठं विधानही केलं आहे. यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “पत्रकार शशिकांत वारिशे यांनी माझ्या माहितीप्रमाणे रिफायनरी येणार म्हणून ज्यांनी भविष्यात विकण्यासाठी कवडीमोल किंमतीत जमिनी घेतल्या, हे जमीनदार कोण आहेत? या संदर्भातील माहिती देण्यास सुरुवात केली होती. रिफायनरी समर्थक, सरकार पक्षातील सध्याचे काही लोक, रत्नागिरीमधील काही राजकारणी, यांचं या प्रकरणात जमिनी घेण्यात कसं परप्रांतीयांबरोबर साटंलोटं आहे. राजापूरात, नाणारच्या आसपास अब्जावधी रुपयांच्या जमिनींचे व्यवहार झाले. त्यासंदर्भात शशिकांत वारिशे यांनी बोलायला आणि लिहायला सुरुवात केली होती. त्यामुळे ते त्याभागातील काही राजकारण्यांच्याही डोळ्यात खूपत होते.”
हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या महिनाभरातील दोन मुंबई दौऱ्यांवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
याचबरोबर “जे पालकमंत्री सध्या आहेत आणि ज्यांनी सुपारी घेतलेली आहे, रिफायनरी आणणारच किंवा तिथले जे केंद्रीयमंत्री आहेत आणि त्यांचं कुटुंबं आहे. काही झालं तरी विरोध मोडून काढून आम्ही रिफायनरी आणणारचं. आगणेवाडीच्या जत्रेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक जाहीर सभा घेतली आणि त्या सभेत रिफायनरीच्या विरोधकांना धमक्या दिल्या. रिफायनरी करून दाखवतो, कोण आडवं येतं पाहू. अशाप्रकारची भाषा केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. २४ तास अगोदर राज्याचे गृहमंत्री सांगतात, रिफायनरीला कोण आडवं येतंय ते पाहू आणि दुसऱ्या दिवशी रिफायनरीला आडवा येणारा एक तरूण पत्रकार मारला जातो. याचा काय संबंध लावायचा, हा योगयाग समजायचा की अजून काय समजायचं?” असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
याशिवाय, “या महाराष्ट्रात आणि देशात कालपर्यंत जे आपल्या विरोधात आवाज उठवतील, जे आपल्या विरोधात लिहितील आणि बोलतील, जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांना ईडी, सीबीआय, पोलीस, प्राप्तिकर विभाग अशा यंत्रणांच्या माध्यमातून अडवकवलं जात होतं, तुरुंगात पाठवलं जात होतं आता हे सरकार एक पाऊल पुढे गेलं आहे. आता विरोधात बोलणारे आणि लिहिणाऱ्यांच्या हत्या होऊ लागल्या आहेत. ही या महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे. ही गुंडशाही आहे, जी महाराष्ट्रात सुरु झाली आहे.” असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे.
पंढरीनाथ आंबेरकरविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा –
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या दुचाकीला भरधाव गाडीने धडक देऊन खून केल्याचा गुन्हा पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरोधात पोलिसांनी दाखल केला आहे. गेल्या सोमवारी घडलेल्या या प्रकारानंतर मंगळवारी पोलिसांनी आंबेरकरला अटक करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला. त्याला ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पत्रकार संघटना, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतर बुधवारी पोलिसांनी आंबेरकरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. राजापूर तालुक्यातील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या प्रमुख नेतेमंडळींमध्ये आंबेरकर याचा समावेश आहे.