किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. आज या कलगीतुऱ्याचा पुढचा अंक राज्यात बघायला मिळाला असून आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मातोश्री दोनचं बेकायदा बांधकाम पैसे देऊन नियमित करण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर शिवसेनेकडून विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांना ‘लाव रे तो व्हिडीओ’ स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिलं. याच पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि भाजपावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हे कोट्यवधी रुपये येतात कुठून?”

“हे जे कुणी किरीट सोमय्या आहेत, त्यांचं गेल्या चार दिवसांपासून रोज एक प्रकरण मी देतोय. पालघरला वेवूर नावाच्या गावात त्यांचा एक फार मोठं प्रोजेक्ट सुरू आहे. त्याची किंमत २६० कोटी आहे. त्यांच्या मुलाच्या नावावर हा प्रकल्प सुरू आहे. त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या त्या प्रकल्पावर संचालक आहेत. या २६० कोटींमध्ये ईडीचे एक संचालक आहेत, त्यांचे किती पैसे आहेत हे मी विचारलं. ही बेनामी मालमत्ता ईडीच्या एका संचालकाची आहे. हे कोट्यवधी रुपये यांच्याकडे येतात कुठून?” असा सवाल राऊतांनी केला आहे.

Narayan Rane PC : मातोश्री २ चं बेकायदा बांधकाम पैसे देऊन नियमित केलं, ईडीला सगळी माहिती दिली आहे – नारायण राणे

“तुरुंगात बसून तुमच्याच कुंडल्या बघा”

“आम्हाला कुंडल्या काढण्याच्या धमक्या देऊ नका. तुम्हाला तुरुंगात बसून तुमच्याच कुंडल्या बघाव्या लागणार आहेत. यांच्या कुंडल्या आहेत, त्याच्या कुंडल्या आहेत. तुमच्या कुंडल्या नाहीयेत का आमच्याकडे? हे महाराष्ट्र सरकार आहे. तुमचं असेल केंद्रात सरकार. पण महाराष्ट्र सरकार मजबूत आहे आणि आमच्या हातात देखील बरंच काही आहे. त्यामुळे उगीच पोकळ धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका, त्यात तुम्हीच फसणार आहात”, असा टोला राऊतांनी लगावला.

“त्या केंद्रीय मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचं काय झालं?”

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना आव्हान दिलं आहे. “भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे नवे महात्मा जन्माला आले आहेत. आम्ही त्यांना आव्हान करतो. तुम्ही जो केंद्रीय मंत्र्यांचा हजारो कोटींचा भ्रष्टाचार काढलाय, ती लढाई पुढे घेऊन जा. आमच्याकडे देखील काही कागदपत्रे आहेत. ती आम्ही तुम्हाला देतो. तुमच्यात हिंमत असेल आणि तुम्ही सच्चे असाल, तर तुम्ही ही लढाई पुढे न्याल. नाहीतर जसे या विषयावर तुम्ही शेपूट घालून बसला आहात, ती तुमची शेपूट आम्ही ओढून काढू”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“भुजबळ ज्या गुन्ह्यात अडीच वर्ष तुरुंगात गेले, तोच गुन्हा ‘मातोश्री’नं केला”, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप!

ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा?

“ही नौटंकी बंद करा. तुमच्या भ्रष्टाचाराचे हिशोब तुम्हीच करत बसा आता. माझं तर स्पष्ट आव्हान आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स लावा आमच्या मागे. आम्ही नाही घाबरत तुम्हाला. तुम्ही कितीही धमक्या दिल्या, तरी रिश्ते में हम आपके बाप लगते है. बाप काय असतो, हे तुम्हाला यापुढे रोज दिसेल”, अशा शब्दांत राऊतांनी भाजपाला सुनावलं आहे. “पुढच्या आठवड्यात ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा आम्ही बाहेर काढणार”, असं देखील राऊत म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut challenge kirit somaiya bjp on ed inquiry warns to disclosed scams pmw
First published on: 19-02-2022 at 15:19 IST