गद्दारांना रस्त्यावर पकडून मारलं पाहिजे, हा बाळासाहेबांचा विचार होता. हाच विचार आता राज्यातील जनता अंमलात आणेल, अशी भीती सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० गद्दार आमदारांना आहे, त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा पुरण्यात आली आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी अयोध्या दौऱ्यावरूनही शिंदे गट भाजपाला लक्ष्य केलं.
हेही वाचा – “अयोध्येत जाऊन रामनामाचा जप करणाऱ्यांच्या तोंडात राम अन्…”; ठाकरे गटाचा शिंदे गट-भाजपावर हल्लाबोल!
काय म्हणाले संजय राऊत?
“एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. गद्दारांना रस्त्यावर पकडून मारलं पाहिजे, हा बाळासाहेबांचा विचार होता. बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर गद्दारांविरोधात लढले. बाळासाहेबांचा हा विचार राज्यातील जनता अंमलात आणेल, अशी भीती सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० गद्दार आमदारांना आहे, त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात आली आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर टीकास्र
पुढे बोलताना त्यांनी अयोध्या दौऱ्यावरूनही शिंदे गटाला लक्ष्य केलं. “अयोध्या दौऱ्यात रामाच्या दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनाचा विषय जास्त होता. आम्ही अनेकदा अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतलं आहे. आमच्यावर ही शिंदे गटाची टोळीही होती. त्यामुळे दर्शन आणि शक्तीप्रदर्शन यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे. शक्तीप्रदर्शन करायला अयोध्येला जायची गरज नाही. ठाण्यातील नाक्यावरही शक्तीप्रदर्शन करता येते”, अशी टीका त्यांनी केली.
हेही वाचा – राज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणाऱ्या बृजभूषण सिंह यांना उपरती; म्हणाले, “आता मला त्यांच्याबाबत…!”
अजित पवारांनीही लगावला टोला
दरम्यान, माझा ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे, असं विधान अजित पवार यांनी केले होते. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “अजित पवार हे महाविकास आघाडीतील सहकारी आहेत. अजित पवारांचा ईव्हीएमवर विश्वास आहे, तर तो त्यांचा मुद्दा आहे. पण, देशाचा नाही. देशातील लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही आहे. भाजपाच्या भक्त आणि अंधभक्तांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. त्यामुळे अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे मला वाटत नाही”, असा टोला त्यांनी लगावाला आहे.