Sanjay Raut खासदार संजय राऊत यांनी खाटकाच्या लाकडावर उभ्या असलेल्या बोकडाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यानंतर एसंशि असा उल्लेख करत एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टचा अर्थ काय? ते आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.

संजय राऊत यांची पोस्ट काय?

खबर पता चली क्या? ए सं शी गट. असं म्हणत त्यांनी एका बकऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत हा बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे असं दिसून येतं आहे. मात्र या पोस्टच्या ओळी अगदीच सूचक आहेत. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी त्यांच्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत बकऱ्याच्या फोटोबाबत काय म्हणाले?

“तुम्ही सगळेजण पत्रकार आहात. तुम्ही त्या फोटोचा अर्थ काढू शकता. महाराष्ट्रातला एक बकरा आहे तो बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे. तुम्ही ते लाकूड पाहिलं असेल. गावात, खाटकाच्या दुकानात ते पाहिलं असेल. तसं महाराष्ट्रातल्या बकऱ्याला खाटकाच्या लाकडावर उभं केलं आहे. त्याला सांगण्यात आलं आहे दिल्लीतून की फार शहाणपणा केलास तर मान उडवेन. गप्प उभं राहायचं आणि बे बे करायचं आहे असं त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कुणीतरी सांगितलं आहे. ए सं शी गट म्हणजे काय ते तुम्हाला कळलं पाहिजे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत माझ्या ट्वीटचा अर्थ तुम्हाला कळेल. आज अमित शाह महाराष्ट्रात येत आहेत. मी सध्या बोलणार नाही. मात्र इतकंच सांगू इच्छितो की आता बकरा कापण्याची सगळी तयारी झाली आहे. वेळ आल्यावर मी सांगेनच किंवा त्याआधी तुम्हालाही कळेलच” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा उल्लेख ए सं शी

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा गट म्हणजे ए सं शी आहे असं म्हटलं आहे. सातत्याने ए सं शी असाच उल्लेख ते करत आहेत. त्या प्रमाणेच आज संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाचा उल्लेख एसंशी असा केला आहे. तसंच आपण शुक्रवारी बकऱ्याचा फोटो का पोस्ट केला ते देखील सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस आम्हाला मूर्ख म्हणत आहेत ठीक आहे. पण त्यांना माझा सल्ला आहे की इतका चिडचिडेपणा करु नका. कारण जेव्हा समोरचा माणूस सत्य बोलत असतो आणि द्यायला उत्तर नसतं तेव्हा अशी चिडचिड होते. देवेंद्र फडणवीस यांना मी प्रश्न विचारतो तेव्हा त्यांच्याकडे द्यायला उत्तर नाही. त्यामुळे ते अशी चिडचिड करतात असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.