समृद्धी महामार्गाची पाहणी कऱण्यासाठी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नागपुरात येत आहेत. नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे आणि तिथून ते महामार्गाची पाहणी करण्यासाठी रवाना होणार आहे. असे असताना नागपूर विमानतळाबाहेर कर्नाटक सरकारचे काही मोठे पोस्टर झळकले आहेत. ज्यामध्ये कर्नाटकच्या पर्यटन स्थळाची माहिती असून चला कर्नाटक पाहू असा संदेश आहे. शिवाय या पोस्टरवर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई आणि पर्यटनमंत्री आणि आनंद सिंह यांचेही फोटो आहेत. तर कालच पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी कर्नाटकच्या आरेला कारेने उत्तर दिले जाईल, असं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, “हे मुख्यमंत्र्यांना सरकारला दिलेलं आव्हान आहे आणि महाराष्ट्राला दिलेलं आव्हान आहे. आजच नाशिकमध्ये वृत्तपत्रात वाचलं की, भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार ते असं म्हणतात की कर्नाटकच्या आरेला कारे असं उत्तर देऊ. अरे आरे आणि कारेवाल्यानो कर्नाटक आतमध्ये घुसलं आहे, तुम्ही कधी कारे करणार? नागपुरला तुमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या थोबाडावर त्यांनी पोस्टर चिकटवलं आहे. कोणी म्हणतय गुजरातला येऊन बघा, कोणी म्हणतय कर्नाटकला येऊन बघा, कुठेय महाराष्ट्र तुमचा? चुल्लुभर पानी मै डूब जावो.. तशी तुमच्यावर वेळ आलेली आहे. आता आरेला कारे करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षावर आहे आणि तुम्हाला उद्यापर्यंत समजले विरोधी पक्ष काय करतोय.”

हेही वाचा – “भाजपाचं डोकं फिरलंय, शिवरायांची भवानी तलवारच एकदिवस यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार”; संजय राऊतांचं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर दोन्ही बाजुंनी तणाव निर्माण होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. पण कुणी ‘अरे’ केल्यास आम्ही ‘कारे’ने प्रत्युत्तर देऊ, अशी भूमिका मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी शनिवारी मांडली. कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्री सातत्याने आक्रमक भूमिका घेत असताना त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने एवढय़ा ठोक शब्दांत प्रत्युत्तर देण्याची ही पहिलीच घटना आहे.