राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखेच आहे आणि भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, असे वक्तव्य प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केले. त्यावरून वाद निर्माण झाला असून भाजपा नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत विधाने मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता शिवसेनेने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जावेद अख्तर यांच्या वक्तव्याप्रकरणी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आपल्या देशाची आणि देशातील कुठल्याही संस्थेची तालिबानसोबत तुलना करणं योग्य नाही आहे. हा मजबूत लोकशाहीचा देश आहे. काही लोकांचं वक्तव्य आपल्याला पटत नसलं तरी तालिबानची विकृती आपल्या देशात वाढणार नाही. कारण इथली जनता ही लढणारी आहे संघर्ष करणारी आहे आणि इथले राजकीय पक्षांनी आणीबाणीसुद्धा पाहिली आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“हिंमत असेल तर जावेद अख्तर यांना…”; राम कदम यांचं शिवसेनेला खुलं आव्हान

अख्तर काय म्हणाले?

तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांबद्दल जावेद अख्तर म्हणाले, ‘‘त्यांची वक्तव्ये माझ्या लक्षात नाहीत. मात्र अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्याचे मोजक्या मुस्लिमांनी समर्थन केले आहे. त्यांची वक्तव्ये ऐकून धक्का बसला. आज भारतातील बहुतेक तरुण मुस्लिमांना चांगली नोकरी आणि त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे असे वाटते. तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे प्रतिगामी विचारांचे समर्थन करीत आहेत. जिथे महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो, अशा प्रतिगामी विचारांना ते प्रोत्साहन देत आहेत.’’

एका आठवड्याचा अल्टिमेटम, नाहीतर….; नितेश राणेंचा जावेद अख्तर यांना इशारा

दरम्यान, जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाल्याने भाजपा नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत विधाने मागे घेण्याची मागणी केली आहे. अख्तर यांनी माफी मागून ते विधान मागे न घेतल्यास त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा मुंबई भाजपाचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. अख्तर यांचे वक्तव्य चुकीचे आहे, इतकेच नव्हे हा हिंदू समाजाचा अपमान आहे. हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करत आहेत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जाऊन तालिबानवर टीका करून दाखवावी, असे आव्हानही भातखळकर म्हणाले. जावेद अख्तर यांचे वक्तव्य निषेधार्ह असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reaction javed akhtar rss vhp bajrang dal statement abn
First published on: 06-09-2021 at 12:28 IST