एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. या बंडखोरीमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्या बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन बोलावले आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करावे लागेल. दरम्यान, पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे ठाकरे बहुमत चाचणी होण्याआधीच राजीमाना देतील असे म्हटले जात आहे. ही चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरे शेवटपर्यंत लढणार आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

हेही वाचा>>> मंत्रीमंडळ बैठकीत नामांतराबाबत मोठे निर्णय; ‘संभाजीनगर’, ‘धाराशीव’ नावांचा प्रस्ताव मंजूर

“उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे त्यांनीच सांगितले आहे. मी जेव्हा म्हणतो खंजीर खुपसला म्हणतो तेव्हा पर्यटणाला गेलेल्या आमच्या सहकाऱ्यांना वाईट वाटतं. उद्धव ठाकरे यांनी त्याच भावना व्यथित होऊन व्यक्त केल्या आहेत. उद्धव ठाकरे हे पळपुटे नाहीत. ते आमचे नेते आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. त्यांच्या पाठीशी महाराष्ट्राच्या भावना आहेत. या भावनेचा आदर ते करतील. शेवटच्या क्षणापर्यंत ते लढत राहतील,” असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा>>> Supreme Court Hearing: राज्यपालांनी विरोधी पक्षनेत्याच्या सल्ल्यानुसार वागू नये; भेटीनंतर लगेच बहुमत चाचणीची मागणी कशी काय? शिवसेनेचा आक्षेप

तसेच, “ज्यांना सत्ता अशा प्रकारे काबीज करायची असेल ते करु शकतात. पण येणारा काळ शिसेनेचा असेल. यातून आम्ही उभे राहू आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये एक शिवसैनिक मुख्यमंत्री होईल. आम्ही जिथे आहोत तिथून लढाई सुरु ठेवू आणि एक दिवस शिवसैनिक मुख्यमंत्री करु,” असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा>>> Maharashtra Political Crisis Live : “बहुमत सोडाच, इथे सत्तेतला पक्षही अल्पमतात आलाय”, एकनाथ शिंदेंच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद!

“बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अशी सहज कोणाला संपवता येणार नाही. सत्तेच्या आणि पैशांच्या बळावर तर नक्कीच नाही. अशी अनेक आव्हाने आणि संकटं पचवून ही शिवसेना मराठी माणसांचे, हिंदुत्वाचे रक्षण करत उभी राहिली आहे आणि पुन्हा एकदा उभी राहीन, असेदेखील संजय राऊत म्हणाले.