उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज वाढदिवस आहेत. या वाढदिवसानिमित्त नागपूरमधील भाजपा कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. हे बॅनर्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. कारण यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेच्या शपथविधीचा (२०१९) फोटो असून त्यावर लिहिलेली वाक्ये लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनर्सवर “ही दोस्ती तुटायची नाय, “अजितदादा हे राजकारणातले दादा आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले चाणक्य आहेत” अशी वाक्ये लिहिली आहेत. या बॅनरवर राजकीय प्रतिक्रियादेखील येऊ लागल्या आहेत.

तत्पूर्वी, अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि त्यांच्या गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांच्या ट्वीटने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व…”, अजित पवार हे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि राज्यात अजितपर्व सुरू होईल, असा दावा अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्वीटमधून केल्याचं पाहायला मिळत आहे.

अमोल मिटकरी यांचं ट्वीट आणि नागपुरातली बॅनरबाजी यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “कोणी काही ट्वीट करायची गरज नाही. अजित पवार हे उपमुख्यमंत्री बनायला गेले तेव्हाच मी सांगितलं होतं की, अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होतील. हे सांगणारा मी पहिला माणूस होतो. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल, हे मी आधीच सांगितलं आहे.” दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील बॅनर्सवर प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे मिळून एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करतील.”

हे ही वाचा >> “त्यात एखादा मुसलमान असता तर…”, मणिपूरमधील घटनेवरून संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत म्हणाले, ही दोस्ती आहे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे जवळचे संबंध आहेत, हे दोघे मिळून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा अगदी मस्त कार्यक्रम करतील. हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आलोय. सगळं काही ठरलेल्या स्क्रिप्टप्रमाणे होईल.