मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांनी रेखाटलेलं जुनं व्यंगचित्र एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केलं आहे. या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघे भारतीय प्रजासत्ताकाला फासावर लटकवताना दिसत आहेत. तर, दुसऱ्या बाजुला मनसेने संजय राऊत यांचे पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करतानाचे जुने व्हिडीओ शेअर केले आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे हे एक उत्तम व्यंगचित्रकार आणि उत्तम कलाकार आहेत. मी त्यांच्याबरोबर अनेक वर्षे काम केलं आहे. त्यांच्या मनातल्या संवेदना, खंत इतर कुठल्याही व्यक्तीपेक्षा मला जास्त माहिती आहे. या देशाचं स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक मोदी-शाहांच्या हातून फासावर लटकवलं जात असल्याचं व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढलं होतं. मला ते खूप आवडलं होतं. मी यात राजाकारण पाहत नाही. महाराष्ट्रातील जनतेची भावना राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रातून पाहायला मिळाली होती. काल राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्या भेटीत राज ठाकरे यांनी नक्कीच तिथे यावर चर्चा केली असेल.

हे ही वाचा >> “राज ठाकरेंची खंत फक्त मलाच माहिती”, अमित शाहांच्या भेटीवर संजय राऊतांची खोचक टिप्पणी; ‘त्या’ व्हिडीओचा केला उल्लेख

ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले, आपण अनेकदा पुलवामा हत्याकांडासंदर्भात बोलतो, विचार करतो, त्याबाबत आपली खदखद व्यक्त करतो. राज ठाकरे यांनी एका भाषणात पुलवामा हत्याकांडामागचं रहस्य उघड केलं होतं. राज ठाकरे म्हणाले होते की, पुलवामा हत्याकांडाच्या आधी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या दोघांची बँकॉक येथे गुप्त भेट झाली होती. त्या भेटीनंतर पुलवामा हत्याकांड घडलं का? असा प्रश्न राज ठाकरेंना पडला होता. राज ठाकरे यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. मला वाटतं की कालच्या भेटीनंतर राज ठाकरे यांना त्यांच्या पुलवामाबाबतच्या प्रश्नाचं उत्तर अमित शाह यांनी दिलं असेल.