महाविकास आघाडीचं महाराष्ट्रातील लोकसभेचं जागावाटप जाहीर केलं असलं तरी सांगली, भिवंडी आणि दक्षिण-मध्य मुंबईच्या जागेवरून मोठा तिढा निर्माण झाला आहे. काँग्रेसचा दावा असलेल्या या तिन्ही जागांपैकी दक्षिण मुंबई आणि सांगलीच्या जागेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर भिवंडीच्या जागेवर शरद पवार गटाने त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघातील स्थानिक काँग्रेस नेते नाराज आहेत. सांगलीतले स्थानिक नेते सध्या नॉट रिचेबल असल्याचं सांगितलं जात आहे. दुसऱ्या बाजूला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची आज (१०) बैठक होणार होती. मात्र माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड या बैठकीला अनुपस्थित असल्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी हे तिढे कसे सोडवणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, आम्ही याआधी शिवसेना-भाजपा युतीत होतो. तेव्हाही भाजपाबरोबर एखाद-दुसऱ्या जागेवर शेवटपर्यंत आमचे मतभेद असायचे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तर आमचे नवे भिडू आहेत. त्यामुळे असे मतभेद होणार, जागावाटपात अशा अडचणी येणार हे आम्ही आधीपासूनच गृहित धरलं आहे. त्यात सांगली आणि भिवंडीचा तिढा निर्माण झाला आहे. दक्षिण मुंबईत अजिबात वाद नाही. ती आमची विद्यमान जागा असून आमच्याकडेच राहील. सांगलीची जागा आम्ही नव्याने घेतली आहे. तिथे परंपरेने काँग्रेसचे लोक निवडून आले आहेत. शिवसेनेची तिथे निवडणूक लढण्याची ताकद कमी आहे. मात्र मतदार मशाल या चिन्हावर मतदान करतील असं आमचं म्हणणं आहे. मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये तिथे काँग्रेस दिसली नाही. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा तिथे ४ लाख मतांनी पराभव झाला होता. २०१९ ला काँग्रेसने ती जागा त्यांच्या मित्रपक्षासाठी सोडली होती. भावनिकदृष्ट्या काँग्रेस तिथे दावा करू शकते, मात्र त्यात तथ्य नाही.

महाविकास आघाडीत तीन जागांवर तिढा निर्माण झाल्याने या जागांबाबत काही वेगळे निर्णय होऊ शकतात का? असा प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “जागावाटप पूर्ण होऊन ते जाहीर झालं आहे, त्यात आता कोणताही बदल होणार नाही. उमेदवार जाहीर झाले आहेत. त्या त्या भागात शिवसेना (उबाठा गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभा घेतल्या आहेत. उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या चालू आहेत. बैठका होत आहेत. त्यामुळे आम्ही नाराज नेत्यांची समजूत काढू.” संजय राऊत टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा >> राज ठाकरे यांना मविआत घेण्याचे प्रयत्न का झाले नाहीत? संजय राऊत म्हणाले, “मनसे अध्यक्षांना वाटायचं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत म्हणाले, अशाच प्रकारे नाराजी आमचेही लोक दाखवू शकतात. अमरावतीत, कोल्हापुरात किंवा रामटेकला आमचे नेते नाराजी दाखवू शकतात. किंबहुना आमच्या तिथल्या लोकांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. मात्र आम्ही त्यांना थांबवलं. आम्ही त्यांना सांगितलं की, आपण आघाडी धर्म पाळला पाहिजे. जी जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल तिथे आपण त्यांच्या उमेदवाराचा प्रचार केला पाहिजे.