सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार आता सुनावणीचे वेगवेगळे टप्पे पार पडणार आहेत. मात्र, हा फक्त वेळकाढूपणा चालू असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, आपल्याला महाराष्ट्रात न्याय मिळणार नसून सर्वोच्च न्यायालयच शिवसेनेला न्याय देऊ शकेल, असंही ते म्हणाले आहेत.

आमदारांना नोटिसा, राऊतांचं टीकास्र

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर या प्रकरणाची सुनावणी चालू असून यासंदर्भात ठाकरे गटाच्या आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यासंदर्भात राऊतांनी हल्लाबोल केला आहे. “शिवसेना कुणाची हा प्रश्न नोटीस पाठवून जर कुणी विचारत असेल, तर ते वेळकाढूपणा करत आहेत. शिवसेना कुणाची हे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट म्हटलं आहे. काही आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असं होत नाही. पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा. सध्या साक्षीपुराव्यांवर वेळ काढणं चालू आहे. शिवसेना कागदावर ठरत नाही. बाळासाहेबांनी शिवसेना महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण केली आहे. ती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आजही काम करत आहे. शिंदे सरकारचं हे औटघटकेचं राज्य आहे. ते फोडाफोडीच्या भ्रमात आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

“आमच्यावर सर्वात आधी अन्याय…”

“महाराष्ट्रात आम्हाला न्याय मिळणार नाही. द्यायचा असता, तर वर्षभरापासून हे बेकायदा सरकार चाललं नसतं. आम्हाला सर्वोच्च न्यायालयातच न्याय मिळेल.आमच्यावर सर्वात आधी निवडणूक आयोगानं अन्याय केला आहे. आयोग आता भाजपाचा घटक आहे. भाजपा जे केंद्रातून सांगेल, तेच ते ऐकतील. जे भाजपाबरोबर आहेत, त्यांच्याबरोबर निवडणूक आयोग आहे. पण जनता आमच्याबरोबर आहे”, असं राऊत म्हणाले.

“सर्वोच्च न्यायालयानं राजकीय पक्ष काय असतो, हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजही शिवसेना आहे आणि राहील. हे टाईमपास करतील. सध्या राज्याच्या विधानसभेत टाईमपास एक, टाईमपास दोन, टाईमपसास तीन अशी सीरिज चालू आहे. त्याची कथा, पटकथा, संवाद आपले लवाद अध्यक्ष करत आहेत. करू द्या. जेवढी मोठी वेबसीरिज त्यांना करायची आहे, ती करू द्या. पण आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडूनच न्याय मिळेल”, असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केला.

नांदेडमधील घटनेवरून टीका

दरम्यान, नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्ण दगावण्याच्या घटनेवरून संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे. ” ही गेल्या वर्षभरातली पहिली घटना नाही. कळव्याच्या पालिका रुग्णालयात काय झालं होतं? महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय रुग्णालयात सध्या ही परिस्थिती आहे. कळव्याच्या रुग्णालयातील प्रकारानंतर अजित पवारांनी प्रश्न विचारला होता की मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे कसं घडू शकतं? त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं नाही. ते संपूर्ण राज्याचे पालक आहेत. सरकारला फक्त जमिनीच्या व्यवहारात, परदेश दौऱ्यात, माणसं फोडण्यात रस आहे”, असं ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जर थोडीतरी माणुसकी शिल्लक असेल, तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घ्यावा. आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यात रस नसून ते वेगळ्याच कामात अडकलेले असतात. सरकार अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात कुठलं दुर्लक्षित मंत्रालय असेल, तर तो आरोग्य विभाग आहे”, असंही राऊतांनी नमूद केलं.