गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील अनेक मोठ्या पक्षांमधील नेते भाजपात प्रवेश करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही लहान-मोठे पक्ष भाजपाशी युती करत आहेत. विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचं भाजपमध्ये इन्कमिंग चालू असतानाच महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांना मोठं आवाहन केलं आहे. “आपआपल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भाजपामध्ये घ्या आणि गाव तसेच शहरातील छोटे पक्ष संपवा”, असं थेट आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे. यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागत आहेत. अनेक लहान-लहान प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन एनडीएची उभारणी करावी लागत आहे. तुम्ही कितीही म्हणालात, याला संपवू.. त्याला संपवू.. तरी ते शक्य नाही. कारण सध्या तरी या देशात लोकशाही आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी काहीही सांगू देत, २०२४ नंतर तुमचा पक्ष राहतोय का बघा… तुमचा पक्ष भाजपा राहिलेला नसून काँग्रेसमय झाला आहे. त्या पक्षात आलेल्या काँग्रेसवाल्यांनी किंवा आमच्यासारख्या तिकडे गेलेल्या लोकांनी ठरवलं तर एका रात्रीत भाजपा संपून जाईल. त्यांनी ठरवलं भाजपा सोडायची तर तुमच्या पक्षाचं अस्तित्व संपेल. तुमच्या ३०३ खासदारांपैकी ११० खासदार मूळ भाजपाचे आहेत. बाकी सर्वजण काँग्रेस आणि इतर पक्षातून आलेले आहेत. या सर्व नेत्यांनी आणि खासदारांनी ठरवलं की आता भाजपा सोडायची तर हा देश भाजपामुक्त होईल, हे बहुदा बावनकुळेंना माहिती नसावं.
भाजपावाल्यांना त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या प्रमुख लोकांची गरज भासते. मग तुम्ही इतकी वर्षे काय #### बसला होता? ही तुमची ताकद परावलंबी आहे. लहान पक्ष संपवू, ही तुमची भूमिका हुकूमशाहीला पुढे नेणारी आहे. देशातून लोकशाही संपवायची असा त्यांचा प्रयत्न चालू आहे. या देशात हुकूमशाहीविरोधात जे पक्ष उभे राहतील त्यातले लहान पक्ष संपवणं, मोठे पक्ष फोडणं ही या बावनकुळेछाप भाजपा नेत्यांची एक भूमिका आहे, जी महाराष्ट्राला आणि देशाला घातक आहे.
हे ही वाचा >> “जगाच्या इतिहासात असं जागावाटप झालं नाही”, प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ मागणीवर संजय राऊतांची नाराजी
ठाकरे गटातील खासदार म्हणाले, या भाजपावाल्यांना देशातून लोकशाही नष्ट करायची आहे, आपलं स्वातंत्र्य नष्ट करायचं आहे, लिहण्याचं, बोलण्याचं आणि निवडणुका लढण्याचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं आहे. बावनकुळे बोलतायत ती त्यांच्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका आहे. ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणींची भूमिका नाही. ही मोदी – शाहांची विचारसरणी आहे. या विचारसरणीविरोधात आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. २०२४ च्या निवडणुकीत कोण कोणाला संपवतंय हे लवकरच समजेल. मैदानात कोण राहतंय आणि कोण संपतंय, जनता लोकशाही मार्गाने कोणाला गाडतेय ते कळेल. परंतु, ते चित्र पाहण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंनी अस्तित्वात असावं.