बेळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचे निकाल आज जाहीर करण्यात आले. यामध्ये भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र, त्याच वेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचा मात्र मोठा पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपाकडून विजयाचा आनंद व्यक्त केला जात असताना दुसरीकडे शिवसेनेकडून मात्र टीका करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात बोलताना महाराष्ट्रातील भाजपावर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. “बेळगावमध्ये मराठी माणूस हरल्याबद्दल तुम्ही पेढे वाटताय, लाज नाही वाटत तुम्हाला?” असा सवालच संजय राऊता यांनी भाजपाला केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पराभवामागे कारस्थान?

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना बेळगावमधील निकालांमागे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला आहे. “मराठी माणूस बेळगावमध्ये सत्ता स्थापन करेल अशी आम्हाला खात्री होती. याआधी बेळगावमध्ये मराठी एकजुटीचाच विजय झाला आहे. पण आज २ किंवा ३ जागा मिळाल्याची माहिती आहे. हे दुर्दैवी जरी असलं, तरी यामागे किती कारस्थान झालं असेल, याची कल्पना करवत नाही. कर्नाटक सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून बेळगाववर महाराष्ट्राचा हक्क राहू नये, यासाठी काय गडबड केली आहे त्यासंदर्भात माहिती हळूहळू समोर येईल”, असं ते म्हणाले.

ज्यांना उकळ्या फुटतायत त्यांना…

बेळगावमध्ये भाजपाचा विजय झाल्यानंतर महाराष्ट्रातील भाजपाकडून त्यावर आनंद व्यक्त करण्यात येत असताना त्यावर संजय राऊत यांनी टीका केली. “बेळगावात मराठी माणसाच्या झालेल्या पराभवाबद्दल आज महाराष्ट्रात ज्यांना उकळ्या फुटत आहेत, जे आज पेढे वाटतायत, त्यांना एवढंच सांगतो की महाराष्ट्रात आजपर्यंतच्या इतिहासात इतकी नादानी, इतका नालायकपणा आणि मराठी माणसाच्या बाबतीत इतकी गद्दारी आत्तापर्यंत कुणी केली नव्हती. महाराष्ट्रात अनेकांना याचं दु:ख आहे की तिथे मराठी माणूस हरवला गेला. पण तुम्ही पेढे कसले वाटताय?” असं राऊत म्हणाले.

बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाची सत्ता; महाराष्ट्र एकीकरण समितीची पिछेहाट

“तुमचा पक्ष जिंकला असेल, पण मराठी माणसाच्या एकजुटीचा तिथे पराभव झालाय. जे पेढे वाटतायत, त्यांना मराठी जनता माफ करणार नाही. शेकडो लोकांनी बलिदान दिलंय. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली ६९ मराठी सैनिकांनी हौतात्म्य दिलंय. बाळासाहेब त्यासाठी तुरुंगात देखील गेले आहेत. पण तुम्ही पेढे वाटताय मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत तुम्हाला? राजकारण बाजूला ठेवा पण एक मराठी माणूस म्हणून तुम्हाला पेढे वाटताना, जल्लोष करताना लाज वाटली पाहिजे”, असं देखील राऊत म्हणाले.

“बेळगावात शिवसेनेच्या वायफळ प्रांतवादाला लाथाडून राष्ट्रवाद जिंकला”; भाजपा आमदाराचा राऊतांना टोला

“..तेव्हा तोंडात बोळकं का कोंबलं होतं?”

दरम्यान, संजय राऊत यांनी यावेळी बोलताना गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे देखील बेळगावातील मराठी संघटनांच्या पाठिशी कसे राहिले, त्याचं देखील उदाहरण दिलं. “जर तुमचा भगवा तिथे खरंच असेल, तर कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा उतरवला तेव्हा तुमच्या तोंडात बोळकं का कोंबलं होतं? तिथल्या मराठी माणसांवर अन्याय होतो, तेव्हा तुम्ही गप्प का बसता? महाराष्ट्र एकीकरण समिती तिथल्या मराठी माणसाची प्रातिनिधिक समिती आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे देखील महाराष्ट्र एकीकरण समितीच्याच पाठिशी उभे राहिले होते”, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams bjp on belgaum corporation election win maharastra ekikaran samiti pmw
First published on: 06-09-2021 at 17:03 IST