मुंबई, ठाणे, नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत जागावाटपावरून सत्ताधारी महायुतीबरोबरच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील संबंधही तुटेपर्यंत ताणले जात असल्याचे चित्र शनिवारी होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमूधन श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी परस्पर जाहीर करणे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बैठकीत भाजपबद्दल नाराजी व्यक्त होणे या घटनांनी महायुतीच्या जागावाटपाच्या वादात तेल ओतले गेल्याचे मानले जाते.

भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात कल्याण आणि ठाणे या दोन जागांवरून वाद होता. परंतु शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत यांची कल्याणमधून परस्पर उमेदवारी जाहीर केली. असे करून त्यांनी ठाण्याच्या जागेवरचा भाजपचा दावा कायम ठेवल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या आमदार आणि नेतेमंडळींच्या बैठकीत भाजपच्या कुरघोडय़ांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतही धुसफूस असून सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस परस्परांना इशारे देत आहेत. 

MLA chandrakanat Patil is upset as Eknath Khadse will return to BJP
खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप
Hingoli Candidate Hemant Patil Changed by Shiv Sena
शिंदे गटाला धक्का! शेवटच्या टप्प्यात हिंगोलीचा उमेदवार बदलण्याची नामुष्की; हेमंत पाटील यांचे तिकीट कापले
Kirit Somaiya shinde fadnavis
“या सरकारमध्येही घोटाळा होणार होता, पण…”, सोमय्यांचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर; भाजपावरही आरोप

हेही वाचा >>>राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”

विदर्भातील पहिल्या टप्प्यातील मतदान दोन आठवडय़ांवर येऊन ठेपले तरी महायुती तसेच महाविकास आघाडीला जागावाटप जाहीर करता आलेले नाही. दोन्ही आघाडय़ांमध्ये परस्परांवर कुरघोडी करण्याचेच राजकारण सुरू आहे. त्याचे प्रत्यंतर ठाणे, कल्याण आणि सांगलीच्या जागांवरून आले. भाजपकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या कुरघोडय़ांमुळे शिंदे गटाचे नेते संतप्त झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यात भाजपच्या दबावाच्या राजकारणावर तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी पपस्पर फडणवीस यांनी जाहीर केल्याची बाबही शिंदे समर्थकांच्या पचनी पडलेली नाही. ठाण्याच्या जागेवर दावा कायम ठेवण्यासाठीच फडणवीस यांनी ही खेळी केल्याची शिंदे गटाच्या नेत्यांची भावना झाली आहे.

ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, औरंगाबाद, पालघर या जागा मित्र पक्षांना सोडू नयेत. हे मतदारसंघ आपल्याकडेच कायम राहावेत, अशी स्पष्ट भूमिका नेत्यांनी मांडली. वर उल्लेखीत मतदारसंघावरील दावा सोडू नये, अशी मागणी उपस्थित नेत्या-पदाधिकाऱ्यांनी केल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. काही जागांवर आम्ही तडजोड केली असली तरी आणखी तडजोड नको अशीच नेतेमंडळींची भूमिका होती, अशी माहितीही शिरसाट यांनी दिली.

हेही वाचा >>>६५ वर्षात विकास केला नाही, आता दहा वर्षाचा विकास कसा मागता? आमदार सातपुते यांचा काँग्रेसला सवाल

सांगलीवर काँग्रेसनेही दावा केला आहे, मात्र ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे काही वेडेवाकडे कराल तर राज्यभर त्याचे परिणाम होतील, असा इशारा राऊत यांनी दिल्याने काँग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. भिवंडीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्याने काँग्रेसचे स्थानिक नेते वेगळी भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहेत.

संजय राऊत यांच्यामुळेच आघाडीत बिघाडी निर्माण होत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे म्हणणे आहे. सांगलीचा प्रश्नच शिल्लक नाही, असा संजय राऊत दावा करीत असले तरी काँग्रेसने मात्र हा मतदारसंघ सोडलेला नाही. संजय राऊत यांनी सांगली दौऱ्यात काँग्रेस नेत्यांबद्दल केलेल्या विधानांवरून जिल्हा काँग्रेसने राऊत यांचा निषेध केला आहे.

 विश्वजीत कदमांची धावाधाव

सांगलीची जागा काँग्रेसकडे राहावी यासाठी आमदार विश्वजीत कदम हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटींसाठी दिल्ली, नागपूर अशी धावाधाव करीत आहेत. कदम यांनी शुक्रवारी दिल्ली गाठून राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. आज शनिवारी त्यांनी नागपूर गाठले. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि सरचिटणीस मुकुल वासनिक यांची भेट घेतली. हे दोन्ही नेते विदर्भात प्रचारासाठी आले आहेत. कदम यांनी दोन्ही नेत्यांशी एका हॉटेलात तासभर चर्चा केली. कदम यांनी ही चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगितले. राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना विश्वजीत कदम म्हणाले, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आघाडीत बिघाडी होईल असे वक्तव्य करू नये. सांगली जिल्ह्यात जनावरांना जरी विचारले तरी ते सांगली हा काँग्रेसचा जिल्हा आहे, असे सांगतील. वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, पतंगराव कदम यांनी सांगलीच्या मातीत परिश्रम घेऊन पक्ष मोठा केला. संपूर्ण महाराष्ट्र या वाटचालीचा साक्षीदार आहे. विशाल पाटील यांच्या रूपाने आम्ही सांगलीत एक सक्षम उमेदवार देत आहोत. आम्ही सांगलीतून लढणार अशी भूमिका सातत्याने मांडली आहे. काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, असेही कदम म्हणाले.

नाशिकसाठी शिंदे गट आग्रही

रामटेक, हिंगोली आणि यवतमाळमधील विद्यमान खासदारांना भाजपच्या दबावामुळे उमेदवारी नाकारण्यात आल्यावरून शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. आपला पक्ष भाजपच चालवत असल्याचा संदेश राज्यभर जाणे योग्य नाही याकडेही नेतेमंडळींनी बैठकीत लक्ष वेधले. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित अशा बातम्या येत असल्याने नेतेमंडळींनी ही जागा सोडू नये, अशी आग्रही मागणी केली. 

भाजपचे शिंदे गटाला आव्हान?

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी मुद्दामहून जाहीर केलेली नाही. असे असतानाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची कल्याणमधून परस्पर उमेदवारी जाहीर करून शिंदे गटाची कळ काढली. विद्यमान खासदारांना बदलणे किंवा उमेदवाराची घोषणा भाजपने करणे हे घडू लागल्याने शिंदे यांच्या पक्ष प्रमुखपदाच्या अधिकारालाच भाजप आव्हान देत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

सांगलीवरून जुंपली

महायुतीत भाजपची कुरघोडी सुरू असताना महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. सांगलीत शिवसेना ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसचे नेते बिथरले आहेत. संजय राऊत सध्या सांगली दौऱ्यावर असून, त्यांनी काँग्रेसला डिवचल्याने पक्षाचे नेते संतप्त झाले आहेत.