तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्या पंढरपूर दौऱ्यावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. केसीआर यांनी पंढरपूरमधल्या सभेत बोलताना महाराष्ट्रातील सर्व पक्ष आम्हाला एवढे का घाबरतात? असा खोचक प्रश्न केला होता. त्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या टीकेवर आज पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला.

काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?

केसीआर यांना मतविभाजनासाठी भाजपानंच महाराष्ट्रात बोलावल्याची टीका ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मविआला केसीआर यांची भीती असल्याचं बावनकुळे म्हणाले होते. “केसीआर यांचं नावही आम्हाला माहिती नाही. ते आमची बी टीम कशी असेल? मविआलाच केसीआर यांची भीती आहे. म्हणून ते केसीआर यांना आमची बी टीम म्हणत आहेत. मविआला जेव्हा पराभवाची भीती असते, तेव्हा ते असा आरोप करतात”, अशा आशयाचं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं होतं.

“…म्हणून भाजपानं ओवैसींच्या जागी केसीआर यांना उतरवलंय का?” ठाकरे गटाचा परखड सवाल!

दरम्यान, बावनकुळेंच्या या टीकेला ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊतांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. “चंद्रशेखर बावनकुळेंना इतकं महत्त्व देण्याची गरज नाही. चंद्रशेखर बावनकुळे स्वत:च भाजपाची ‘सी टीम’ आहेत. त्यांच्या हातात काहीही नाहीये. सगळं काही दिल्लीहून ठरतं. महाराष्ट्रात आता भाजपाची धुरा ना देवेंद्र फडणवीसांकडे आहे ना बावनकुळेंकडे. सगळं दिल्लीच्या आदेशांवर चालतं. के चंद्रशेखर राव यांची वकिली बावनकुळे कधीपासून करायला लागले? तुमच्या पक्षाकडे बघा”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

“मी फक्त एवढंच म्हटलं की…”

“मी फक्त एवढंच म्हटलं की भाजपानं महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्यासाठी किती बी टीम, सी टीम बनवून ठेवल्या आहेत. आता ही नवीन टीम बनवली आहे. २०१९ला त्यांनी एमआयएमला बी टीम बनवलं होतं. कधी आणखी कुणाला करतात. नंतर काम झालं, की रात गई, बात गई. आता त्यांनी केसीआर साहेबांना बोलवलं आहे. पण महाविकास आघाडी प्रत्येक लढाईसाठी समर्थ आहे, आम्ही लढाई लढू आणि जिंकू”, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

“भाजपानं केसीआर यांना सुपारी दिली”

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी केसीआर यांनाही खोचक सल्ला दिला. “केसीआर यांनी तेलंगणा राज्यातल्या शेतकऱ्यांचं हित जरूर पाहावं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं हित पाहण्यासाठी इतर राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी इथे येण्याची गरज नाही. हा आमच्या राज्यातला हस्तक्षेप ठरेल. तुमचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर काम करत नाही. तुमचा पक्ष बाजूच्या आंध्र प्रदेशातही नाही. पण तुम्ही महाराष्ट्रात घुसताय. याचं कारण भाजपानं तुम्हाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्रास देण्यासाठी, मतविभागणी करण्यासाठी सुपारी दिली आहे”, असं राऊत म्हणाले.

Video: “आयुष्यात असे क्षण येतात आणि मन अंतर्बाह्य थरारतं”, देवेंद्र फडणवीसांची भावनिक पोस्ट; शेअर केला ‘तो’ व्हिडीओ!

“भाजपात बी टीम तयार करण्याचं एक स्वतंत्र कक्ष आहे. कधी ते मनसेला वापरतात, कधी एमआयएमला वापरतात, कधी केसीआर यांना बोलवतात. हे त्यांचं धोरण आहे. पण २०२४ ला त्यांनी असे कितीही प्रयोग केले तरी मविआ मजबुतीनं सगळ्यांशी लढा देईल.केसीआर यांच्या मुलीची ईडी चौकशी करत आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून ते महाराष्ट्रात भाजपाला मदत करण्यासाठी घुसले आहेत”, असा दावाही संजय राऊतांनी केला.