Chhagan Bhujbal: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून मागच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांना संधी नाकारण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे १९, शिवसेनेचे (शिंदे) ११ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ९ मंत्रिपदे देण्यात आले आहेत. अजित पवारांनी त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धर्मराव बाबा आत्राम आणि दिलीप वळसे पाटील यांना वगळले. यानंतर छगन भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी छगन भुजबळ आणि महायुती सरकारवर मोठा आरोप केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात छगन भुजबळ यांचा वापर झाला असल्याचे संजय राऊत म्हणाले.

आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले, छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली होती. त्यांनी अशी टोकाची भूमिका घेऊन नये, अशी आमची इच्छा होती. दोन्ही समाज हे राज्यातील प्रमुख घटक आहेत. मनोज जरांगे यांच्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांना टोकाची भूमिका घ्यायला लावली. भुजबळांचा वापर झाला, हे आता स्पष्ट दिसत आहे. ज्यांनी भुजबळांचा वापर केला, त्यांनीच आता त्यांना वाऱ्यावर सोडले आहे, असे माझे आकलन आहे.

हे वाचा >> Chhagan Bhujbal : “मला जी वागणूक दिली, अपमानित केलं, म्हणून मी…”, मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांचं मोठं विधान

भुजबळांनी कितीही आदळआपट केली तरी आता त्यांच्याकडे लढण्यासाठी किती शारीरिक आणि मानसिक ताकद आहे, हे पाहावे लागेल. राज्यात जातीय सलोखा, समन्वय राहावा, ही आमची पहिल्यापासून मागणी आहे. बाकी लोक आता अश्रू ढाळत आहेत. पण त्यांच्या अश्रूंना आता कोण विचारणार? पुरंदर, बोरीवली, चंद्रपूरच्या आमदारांना आता कुणीही विचारणार नाही. एखाद दुसरा आमदार नाराज झाला म्हणून या सरकारला काहीही फरक पडणार नाही. नाराज आमदारांच्या हाती काही दिवसांनी एखादा खुळखुळा दिला जाईल, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छगन भुजबळ काय म्हणाले?

“मला मंत्रिपद दिले नाही म्हणून मी नाराज नाही. अनेकवेळा अशी मंत्रि‍पदे आली आणि गेली. मी विरोधीपक्ष नेता म्हणूनदेखील काम केलेले आहे. मला ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते आणि अपमानित केले जाते, त्यामुळे मी दु:खी आहे”, असे विधान छगन भुजबळ यांनी केले आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते. एवढेच नाही तर जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, असे सूचक विधान करत आपण कार्यकर्त्यांशी बोलून पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.