राज्यसभेच्या ६ जागांसाठी लवकरच निवडणूक पार पडणार असून संभाजीराजे छत्रपतींच्या उमेदवारीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार यांनी विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी यासंदर्भात सविस्तर प्रतिक्रिया दिली. तसेच, यावेळी भाजपाकडून दबावतंत्र सुरू असल्याचं सांगत शिवसेना आणि महाविकास आघाडी दबावाला भीक घालत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राज्यसभा निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. त्यातच दोन उमेदवार आरामात राज्यसभेवर निवडून जाण्याची खात्री असताना भाजपानं तिसरा उमेदवार देखील उभा करण्याचे सूतोवाच दिले आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध न होता लढवली जाईल, असं चित्र दिसत असल्याचं अजित पवारांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यात शिवसेनेकडून दोन उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी मिळणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

“दोन उमेदवार राज्यसभेत जातील”

संजय राऊतांनी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेवर जातील यात कोणतीही शंका नसल्याचं सांगितलं आहे. “शिवसेनेकडून मी स्वत: आणि कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, आमचे सगळे मंत्री, आमदार, एकनाथ सिंदे, संदीपान भुमरे, खासदार, संपूर्ण महाविकास आघाडी यावेळी उपस्थित होते. मी खात्रीनं सांगू शकतो की यावेळी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेत जातील. आमच्या मनात कोणतीही शंका नाही”, असं राऊत म्हणाले.

“…एवढीच माफक अपेक्षा”, अनिल परबांच्या घरावरील ईडीच्या धाडीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया!

“राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल ३१ तारखेला अर्ज भरतील. काँग्रेसचा उमेदवार ठरल्यावर ते भरतील. पण महाविकास आघाडी एकत्र आहे. सहा जागांपैकी आमच्या चार जागा आम्ही निवडून आणू”, अशी माहिती त्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपावर निशाणा!

“भाजपानं तिसरा, चौथा, पाचवा उमेदवार द्यावा. आम्ही आमच्या जागा निवडून आणू. ईडी, सीबीआय हे दबाव टाकून त्यांच्या जागा जिंकून येणाऱ्या असतील, तर त्यांनी प्रयत्न करत राहावेत. आमची काही अडचण नाही. देशात लोकशाही आहे. आमच्या जागा लढण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. शिवसेना अशा दबावाला भीक घालत नाही”, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला.

“या सर्व कारवाया फक्त राजकीय सूडबुद्धीनं आणि बदल्याच्या भावनेनं सुरू आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला काय चाललंय हे माहिती आहे. हा काळही निघून जाईल आणि एक दिवस ही सूत्र आमच्याकडे असतील”, असंही राऊत यावेळी म्हणाले.