बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी बसचा अपघात झाल्यानंतर बसने पेट घेतला. शनिवारी रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. बसमधील प्रवासी झोपले होते, अशा स्थितीत अपघात झाल्याने २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती समजल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला आहे.
या अपघातात वर्ध्यातील रहिवाशी असणाऱ्या तेजस पोकळे नावाच्या युवकाचाही मृत्यू झाला आहे. मुलाच्या मृत्यूची माहिती समजताच तेजसच्या आईने शासकीय रुग्णालयाबाहेर एकच आक्रोश केला आहे. तेजसला पुण्यात नोकरी लागली होती. सोमवारी तो नोकरीवर रुजू होणार होता. त्यासाठी शनिवारी तो पुण्याला येत होता. पण बुलढाण्याजवळ झालेल्या अपघातात तेजसचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- नाशिक-पुणे महामार्गावर स्कूल बस आणि शिवशाहीचा विचित्र अपघात, एसटीचा पत्रा तुटला अन्…
तेजसच्या मृत्यूची माहिती समजल्यावर तेजसच्या आईने एकच आक्रोश केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संबंधित व्हिडीओ आपल्या ट्विटरवरून शेअर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारला आहे. देवेंद्रजी, एका आईचा आक्रोश तुम्ही ऐकताय ना? असा सवाल राऊतांनी विचारला.
संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “अत्यंत असंवेदनशील सरकार… देवेंद्रजी, एका आईचा हा आक्रोश ऐकताय ना? राजकीय उखाळ्या पाखाळ्या कमी करा. जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या.”
नेमकं काय घडलं?
प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस (एमएच २९ बीई १८१९) होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.
ही बस ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी निघाली होती. १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून उलटी झाली. त्यानंतर काही मिनिटांमध्ये गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि ही दुर्घटना घडली.